घरमहाराष्ट्रनाशिकपूर्वमोसमी पावसाने जिल्हाभरात दाणादाण

पूर्वमोसमी पावसाने जिल्हाभरात दाणादाण

Subscribe

नांदगाव, सटाणा भागात झाडे पडली, वीजपुरवठा खंडीत, पिकांचे नुकसान

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे गुरुवारी (दि.27) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे 12 व्यक्ती जखमी झाले. प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी चाळीसगाव येथे हलवण्यात आले. दरम्यान, या पावसाने घरांसह शेतात उभ्या असलेल्या पिकांचेही मोठे नुकसान केले. शनिवारी आणि रविवारीदेखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने नुकसान केले.

गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या भागात अचानक वादळ सुरू झाल्याने जातेगाव येथील बोलठाण रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्रिभुवन वस्तीलाही त्याचा तडाखा बसला. या ठिकाणी शेतात राहणारे परिघाबाई साहेबराव त्रिभुवन (वय ६०), त्यांचा मुलगा संजय साहेबराव त्रिभुवन (वय ५०) हे दोघेही गंभीर जखमी झाले. संजय यांच्या डोक्यासह डावा हात व पाय, त्याचप्रमाणे शरीरावर जखमा झाल्या. तसेच, त्यांच्या परिवारातील लक्ष्मीबाई संजय त्रिभुवन (वय ४५), शकुंतला त्रिभुवन (वय ४५), भाऊसाहेब साहेबराव त्रिभुवन (वय ४५), सिद्धार्थ विकास त्रिभुवन (वय ८ महिने), संजय सुखदेव शिंगाडे, संजय मांगु शिंगाडे हेदेखील जखमी झाले. त्रिभुवन यांच्या घरासह संसारोपयोगी साहित्य, धान्य असे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले.

- Advertisement -

दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव

गोंडेगाव रस्त्याकडेला शेतात राहत असलेल्या चिंधू वेडुजी जुंधरे (वय ७५), त्यांची पत्नी गयाबाई जुंधरे (वय ६८) हे शेतकरी दांपत्य वादळी पावसात जखमी झाले. वयोवृद्ध आई-वडीलांना भेटण्यासाठी आलेली त्यांची मुलगी कडुबाई जगन्नाथ राऊत (वय ५०, रा.भोकरगाव) हीदेखील या घटनेत गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर गावातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दैव बलवत्तर म्हणून घरातील कुटुंब वाचले. प्रचंड वादळाने त्यांच्या घरावर बाभळीचे मोठे झाड पडले. मात्र, वेळीच सतर्क झाल्याने हे कुटुंब वाचले. या घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. वरील दोन्ही घटनास्थळांची तहसीलदार उदय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार येथील तलाठी किशोर आहिरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला. यावेळी उपसरपंच पंढरीनाथ वर्पे, सदस्य बाळासाहेब लाठे, संदीप पवार, राजू शेख उपस्थित होते.

- Advertisement -

रावळगाव फाट्याजवळील कांद्याचे शेडही भुईसपाट

सटाणा शहरासह परिसरात शुक्रवारी (दि. २८) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसाने घरांसह शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसामुळे काही वेळासाठी जनजीवनही विस्कळीत झाले होते. जोरदार सोसाट्याच्या वार्‍यामुळे सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावरील रावळगाव फाट्याजवळ असलेले कांद्याचे शेडही भुईसपाट झाले. त्यामुळे हजारो क्विंटल कांदा भिजला.

कांदा व्यापारी श्रीधर कोठावदे यांच्या आर. के. ट्रेडर्समधील कांद्याचे शेड वादळाने कोसळले. तर, शेडलगत असलेली बाळासाहेब बच्छाव यांची चहा व किराणा टपरी शेडखाली दबली गेली. या टपरीच्या आडोशाला पावसापासून बचाव करण्यासाठी उभ्या असलेल्या दोन व्यक्ती सुदैवाने बचावल्याने मोठा अनर्थ टळला. सटाणा बाजार समितीतील व्यापारी गोकुळ शिरोडे यांचे कांद्याचे शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा ओला झाला. वादळी वारा आणि मुसळधार पावसात तालुक्यात अनेक ठिकाणी घरांवर व रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. तर, काही ठिकाणी उंच झाडे वीज तारांवर कोसळून विद्युत तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. वार्‍यामुळे शेतशिवारातील विजेचे खांब कोसळल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा अनिश्चित कालावधीसाठी खंडित झाला.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात कमालीचा उष्मा वाढुन उकाडा जाणवत होता. सकाळपासूनच उकाड्याने असह्य केले होते. दुपारी दोननंतर आकाशात हळूहळू ढग जमू लागले व तीनच्या सुमारास अचानकपणे वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली.

सटाणा शहर, मोरेनगर, सटाणा महाविद्यालय परिसर, सावकी फाटा, ठेंगोडा, लोहोणेर, जुनी शेमळी, ब्राह्मणगाव, लखमापूर, यशवंतनगर, औंदाणे, तरसाळी, मुंजवाड, खमताणे, चौंधाणे, कंधाणे, जोरण, किकवारी, कर्‍हे, कौतिकपाडे अशा विविध गावांपर्यंत वादळी वारा आणि पावसाच्या सरींनी उग्ररूप धारण केले होते. त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर या पावसाचा परिणाम झाला. पावसाच्या वेगवान मार्‍यामुळे पाच ते दहा फूट अंतरापर्यंतही दिसत नसल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

या पावसामुळे मे महिन्यात लागवड झालेल्या टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, गवार, भेंडी, वांगे, वाल, शेवगा व इतर भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. तसेच, गुरांच्या चार्‍यालाही फटका बसल्याचे चित्र आहे. काही शेतकर्‍यांचे या पावसामुळे लाखोंचे नुकसान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -