‘फेलो’मुळे सामाजिक दायित्वात वाढ

प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्याशी साधलेला मुक्त संवाद

Principle V B Gaikwad

देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये स्थानबद्ध झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, माजी अधिष्ठाता आणि शैक्षणिक क्षेत्रात १०७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांची महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे ‘फेलो’ म्हणून निवड करण्यात आली. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात साधारणत: हजार तज्ज्ञ व्यक्तिंना ‘फेलो’ मिळाली आहे. त्यामुळे या पदवीला किती महत्व आहे, हे आपल्या लक्षात येते. ‘फेलो’ म्हणजे काय? ही पदवी मिळवण्याचे निकष काय असतात आणि समाजाला याचा काय उपयोग होणार, या प्रश्नांची उकल करण्यासाठी ‘आपलं महानगर’ ने त्यांच्याशी साधलेला संवाद…

महाराष्ट्र विज्ञान अकादमीची ‘फेलो’ म्हणजे काय?

– राज्याच्या वैज्ञानिक क्षेत्रातील आघाडीची संस्था महाराष्ट्र विज्ञान अकादमी (एमएएससी) तर्फे ‘फेलो’ म्हणून निवड केली जाते. राज्याला भेडसावणार्‍या वैज्ञानिक आणि तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही निवड होते. या संस्थेचे मानद सदस्यत्व म्हणजे ‘फेलो’. प्रामुख्याने वर्षभरासाठी ही निवड केली जाते.

‘फेलो’ म्हणून निवड होण्यासाठी निकष काय?

– विज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक असेल किंवा तज्ज्ञ व्यक्ती, त्यांनी स्वत: संशोधन, अध्यापन, शिक्षण, विज्ञान, अभियांत्रिकी व सामाजिक विज्ञान या क्षेत्रात सातत्याने काम केलेले पाहिजे. त्याचा समाजाला काय उपयोग होऊ शकतो, यादृष्टीने ‘एमएएससी’ ही संस्था विचार करते. त्यांची खात्री पटल्यानंतरच त्या व्यक्तिची निवड होत असते.

तुमची निवड कोणत्या निकषांच्या आधारे झाली?

– माझ्याकडील १८ विद्यार्थी पीएच. डी. झाले आहेत. संशोधनाचे एक पेटंट माझ्याकडे असून, याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅगझिनमध्ये साधारणत: १०० पेक्षा अधिक पेपर प्रसिध्द झाले आहेत. याचा मला फायदा झाला. तसेच प्रत्येक शनिवारी ‘विज्ञानवारी’ हा उपक्रम राबवला. सायन्सच्या विद्यार्थ्यांनी फुलांपासून ‘इंडिकेटर’ तयार केले आहेत. त्यांचा अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मोठ्या प्रमाणात फायदा झाला. सोलर एनर्जी लॅब आपण तयार केली. आपल्याकडे केटीएचएम महाविद्यालयाचा एक संपूर्ण मजला सोलर एनर्जीवर चालतो. विद्यापीठाच्या ‘अविष्कार’ या रिसर्च स्पर्धेत महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण होते. या कार्याबद्दल ऑस्ट्रेलियातर्फे मला बेस्ट प्राचार्य हा पुरस्कारही यापूर्वी मिळाला आहे.

‘फेलो’ म्हणून निवड झाल्यानंतर जबाबदारी वाढली?

– निश्चितच! कारण ‘फेलो’ म्हणून निवड झाल्यानंतर आता या संस्थेतर्फे देशातील तज्ज्ञ व्यक्तींचे परिसंवाद आयोजित केले जातील. कम्प्युटर असिस्टंट लर्निंग अर्थात ‘कॅल’ या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते दहावीपर्यतच्या विद्यार्थ्यांना सायन्स विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून ‘लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम’ (एमएमएस)च्या माध्यमातून प्रयोगशाळेतील प्रयोग अगदी सोप्या शब्दांत आणि व्हिडीओद्वारे शिकवले जातील. विज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संशोधन आणि विद्यार्थ्यांचा कल वाढावा, यादृष्टीने हे उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण ठरतील, असा मला विश्वास वाटतो.

कोरोनानंतरची शिक्षण क्षेत्रातील आव्हाने?

– कोरोना काळात प्रॅक्टिकल आणि पिअर लर्निंग अर्थात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकण्याचा आनंद घेता आला नाही. काळानुरुप शिक्षणाची व्याख्या बदलत असून, चालू शैक्षणिक वर्ष जून २०२२ पर्यंत संपेल.