शूटिंगसाठी यापुढे, नाशिक नको रे बाबा!

कलाकार-दिग्दर्शक वादामुळे उद्विग्न झालेल्या प्रसिद्ध निर्माते संजय झनकरांची संतप्त प्रतिक्रिया

Producer Zankar

नाशिक – आमच्या मालिकेच्या सेटवर कोणत्याची चुकीच्या गोष्टी घडत नाहीत. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोपांमुळे मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. सध्याच्या मालिकेनंतर आणखी दोन मालिका नाशिकमध्ये आणण्याच्या विचारात होतो, मात्र आता मी नाशिकमध्ये पुन्हा कधीही काम घेऊन येणार नाही, अशा संतप्त शब्दांत प्रसिद्ध निर्माते संजय झनकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सध्या नाशिकमध्ये शुटिंग सुरू असलेल्या मालिकेतून बाहेर पडलेल्या एका कलाकाराने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे मालिकेच्या दिग्दर्शकावर अनेक आरोप केले होते. मात्र, महानगरच्या टीमने प्रत्यक्ष सेटवर जाऊन प्रत्येकाशी संवाद साधला. सेटवरील वातावरण हे घरासारखे असून आमच्या सोबत कोणताही गैरप्रकार घडत नाही, असे सांगत या मालिकेतील महिला कलाकारांसह पुरूष कलाकारांनी हे सगळे आरोप खोडून काढले. असे असले तरी याचा एकूणच परिणाम नाशिकमध्ये सुरू असलेल्या आणि नव्याने येणार्‍या प्रोजेक्टस्वर होण्याची चिन्हे आहेत. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचे प्रसिद्ध निर्माते झनकर यांनी या प्रकाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुंबईत सर्व सुविधा उपलब्ध असताना नाशिकच्या कलाकारांना वाव मिळावा, दादासाहेब फाळकेंची कर्मभूमी असलेल्या नाशिकला नवी ओळख मिळावी, पर्यटनदृष्टीने येथील व्यवसाय वाढावेत, म्हणून आम्ही नाशिकमध्ये शूटिंगचा निर्णय घेतला. मात्र, एखाद्या कलाकारामुळे संपूर्ण युनिटला त्रास सहन करावा लागतोय. शिवाय या प्रकारामुळे नाशिकच्या कलाकारांच्या कामावर आणि प्रामाणिकतेवर प्रश्न उभे राहिल्याचेही त्यांनी सांगितले.

मग कोल्हापूर का नको?

नाशिकमध्ये एखाद्या मालिकेचे शुटिंग सुरू असताना तांत्रिक समस्या उद्भवली किंवा कॅमेरा हँग झाला तर त्यासाठी थेट मुंबईहून पर्याय उपलब्ध करावा लागतो. त्यात किमान साडेतीन ते चार तास जातात. हीच गोष्ट कोल्हापूरमध्ये शुटिंग सुरू असताना झाली तर अगदी सहजपणे दुसर्‍या सिरीयलच्या सेटवरून पर्याय उपलब्ध होते. असं असतानाही शूटिंगसाठी नाशिकचा पर्याय आम्ही निवडतो. मग, असं काही घडणार असेल तर मग नाशिक नकोच!