Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक ग्रामसेवकांची पदोन्नती रोखली

ग्रामसेवकांची पदोन्नती रोखली

जिल्हा परिषद सीईओंचा निर्णय; तालुका सोडण्याची घातली अट

Related Story

- Advertisement -

 वर्षानुवर्षे एकाच ग्राम पंचायतीमध्ये ठाण मांडलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून एकाच तालुक्यात घुटमळत असलेल्या ग्रामसेवकांना पदोन्नती न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. ग्रामसेवक संघटना जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे येवून तालुक्याबाहेर बदल्या करण्यास परवानगी देणार नाहीत, तोपर्यंत ग्रामसेवकांना पदोन्नती न देण्याचा पवित्रा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी घेतला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.30) स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी सदस्यांनी जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या बदल्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रत्युत्तर देताना ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी गेल्या आठ महिन्यांत विभागाने केलेल्या कारवाईचा आराखडा सभागृहासमोर मांडला. 2002 पासून 150 ग्रामसेवकांची विभागीय चौकशी प्रलंबित होती. त्यावर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत ही चौकशी पूर्ण केली आहे. त्यापैकी 135 ग्रामसेवक हे चौकशीत दोषी आढळले आहेत. त्यावरुन ग्रामसेवकांचा कारभार कशा पध्दतीने सुरु आहे, याची खात्री विभागाला त्यांनी पटवून दिली. तसेच चार वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील 12 ग्रामसेवकांची बदली होवूनही ते बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. शासकीय सेवेतून ते परागंदा झाल्याचे चित्र आहे. अशा ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, दिंडोरी तालुक्यातील या 12 ग्रामसेवकांचे एक वर्षाचे वेतन कापण्याची कारवाई प्रस्तावित असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच पदोन्नतीविषयी सीईओ बनसोड म्हणाल्या की, ग्रामसेवकांना सामोपचाराने पदोन्नती देण्यासाठी बोलवले होते. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून एकाच तालुक्यात काम करत असलेल्या ग्रामसेवकांना तालुका बदलण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी हा प्रस्ताव नाकारल्यामुळे आम्ही पदोन्नत्या रोखल्या आहेत. ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी जोपर्यंत माझ्याकडे येवून तालुक्याबाहेर बदली करण्याचे आदेश मान्य करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत पदोन्नती देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे आता ग्रामसेवकांच्या पदोन्नतीचा विषय चांगलाच चिघळणार असल्याचे दिसते. तथापि, स्थायी समितीच्या सभेपूर्वीच भाजपचे गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी ग्रामसेवकांच्या बदल्या रद्द करण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना दिले होते. परंतु, जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या कामाची पध्दत बघितली तर फारच विदारक चित्र आहे. त्यामुळे ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यास त्यांनीही समर्थन दर्शवले. भास्कर गावित यांनीही पेठ तालुक्यातील ग्रामसेवकांच्या तक्रारींचा पाढा वाचला. महिन्याभरापासून ग्रामसेवकाचा शोध घेत आहे. परंतु, तो सापडलेला नाही. अशा पध्दतीने कामकाज करत असतील तर गावाची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना करा, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. छाया गोतरणे यांनीही करंजवण येथील ग्रामसेवकांच्या बदलीबाबत काय निर्णय घेतला याविषयी विचारणा केली. करंजवण येथील ग्रामसेवकाची चौकशी सुरु असून, चौकशीत ते दोषी आढळ्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आश्वासान सीईओ लीना बनसोड यांनी दिले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, समिती सदस्य सविता पवार, महेंद्रकुमार काले, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.

आशेवाडी ग्रामसेवकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल

दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी ग्रामपंचयातीच्या ग्रामसेवक दिलीप मोहिते ३९ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने त्यांच्याविरोधात आता फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया आता सुरु असून, लवकरच त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असा विश्वास ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी व्यक्त केला. त्यामुळे सावळागोंधळ करणार्‍या ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -