नाशिक जिल्ह्यातील देहविक्री करणार्‍या महिलांना मिळाले रेशनकार्ड

राष्ट्रीय लैंगिक कामगार दिन विशेष

नाशिक: अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडित महिला तसेच, देहविक्री व्यवसायातील महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनेदेखील नाशिक शहरातील देहविक्री व्यवसायातील महिलांना शिधापत्रिकेचे वाटप केले जाणार आहे.

वेश्या व्यवसाय, बालवेश्या आणि वेश्यांचा मुलांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या सल्लागार समितीच्या सुचनेनुसार त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार शासनाने निर्णय घेऊन याबाबत शासननिर्णयदेखील तयार करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्याकडे असणार्‍या यादीतील स्वंयसेवी संस्थाकडून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या महिलांना शिधापत्रिका देण्यात येणार आहे.

जिल्हा पुरवठा कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा एडस नियंत्रण पथक व प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शालिमार चौकातील आयएमए सभागृहात दुपारी १ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अजय फडोल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल योगेश परदेशी उपस्थित राहणार आहेत.

५६७ महिलांना मिळाला लाभ

सर्वोच्च न्यायालाच्या आदेशानुसार आतापर्यंत ६७ महिलांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सुमारे ५३५ महिलांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून २ जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिनानिमित्त १२ महिलांना शिधापत्रिका देण्यात येणार आहे. कोविड काळातही लॉकडाऊन काळात रेशनकार्ड नसतानादेखील त्यांना तीन महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे देहविक्री करणारया महिलांना शिधापत्रिका मिळणे सोयीस्कर होणार आहे. या महिलांकडे शिधापत्रिका मिळवण्यासाठी पुरावे नसल्याने अडचणी येत होत्या मात्र आता त्यांना दर महिन्याला रेशन मिळू शकेल. अनेकदा न्यायालयाने निर्णय देउनही अंमलबजावणी होत नाही परंतू नाशिक जिल्हा पुरवठा विभागाकडून तातडीने पावलं उचलत शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या. आसावरी देशपांडे, प्रकल्प समन्वयक, प्रवरा मेडिकल ट्रस्ट

देहविक्री करणारया महिलांना शिधापत्रिका वितरणाची प्रक्रिया कार्यालयाकडून सुरू आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्याकडे असणार्‍या यादीनूसार ११३७ महिलांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हयातील ५८० महिलांना यापूर्वीच शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. उर्वरित ५३७ महिलांना शिधापत्रिका देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यानूसार २ जून रोजी त्याचे वाटप सुरू करण्यात येईल. – अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी