रामसेतू पुलाकडे वक्रदृष्टी टाकल्यास आंदोलन

रामसेतू बचाव समितीच्या कल्पना पांडे आणि सुनील महांकाळे यांचा इशारा

नाशिक : स्मार्ट सिटीकडून ऐतिहासिक ६० वर्ष जुना रामसेतू पूल तोडण्यात येणार असल्याच्या हालचालींना विरोध केला आहे. पूल न तोडता त्याला डागडुजी व मजबुतीकरण केले तर अधिक काळ तो टिकेल. रामसेतू पुलाकडे कोणीही वक्रदृष्टी टाकू नये अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा रामसेतू बचाव समितीच्या कल्पना पांडे आणि सुनील महांकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कल्पना पांडे म्हणाल्या की, गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गोदा घाटावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेले असताना शहरातील भांडी बाजार आणि पंचवटीला जोडणारा रामसेतू पूलदेखील पाण्याखाली गेला होता. पुराचे पाणी ओसरल्यानंतर रामसेतू पुलाला तडे गेल्याचे प्रशासनाला निदर्शनास येताच शुक्रवारे (दि. १५) पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद करण्यात आला. २००२ साली जुन्या रामसेतू पुलालाच वाढवण्यात आले. तेव्हापासून या पुलावरून वाहनांचा वापर बंद करण्यात आला असून, फक्त पादचारी मार्ग म्हणून वापरला जात आहे. त्यामुळे पादचार्‍यांच्या वजनाने पूल कोसळेल, अशी अवस्था झालेली नाही. २००२ पुलाचे काम करताना पुलाचे सांधे व्यवस्थित भरले गेले नाहीत. पुलावर केलेले डांबरीकरण पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने पुलाची दूरावस्था झाली आहे.

महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पुलाची पाहणी करताना स्थानिकांना सोबत घ्यायला हवे होते. आजपर्यंत स्मार्ट सिटीकडून गोदाघाट परिसरात अनेक कामे हे चुकीच्या पद्धतीने झालेली आहेत. सुशोभिकरण करण्याच्या नावाखाली जुन्या वास्तुंना धक्का लावण्याचे काम करण्यात आले आहे. सरदार चौकातील सांडव्यावरची देवी म्हणून ओळखले जाणारे धार्मिक स्थळामागील सांडवाच स्मार्टसिटीकडून तोडण्यात आला. ब्रिटीश कालीन होळकर पुलाची मुदत संपूनही तो दिमाखात उभा आहे. होळकर पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि पादचारी ये-जा करत आहेत. तरीही, हा पूल सुरक्षित असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. रामसेतू पुलावरील खड्डे, तडे आणि दोन टप्प्यात टाकलेला थर हे खराब दिसत असले तरी ते दुरुस्त करून तो पूल दीर्घकाळ टिकेल.

स्मार्ट सिटीकडून ठेकेदार पोसण्यासाठी नको ते काम केले जात आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीला रामसेतूबाबत निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. पूल पडण्यामागे कोणाची राजकीय इच्छाशक्ती आहेहे स्पष्ट करावे. पूल उभारण्यासाठी केला जाणार्‍या खर्चातून गंगापूर धरणातील गाळ काढावा. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता वाढेल आणि शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल.