घरमहाराष्ट्रनाशिकतत्परतेने पंचनामे करून शेतकरयांना तात्काळ दिलासा द्या; ठाकरे गटाचे जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

तत्परतेने पंचनामे करून शेतकरयांना तात्काळ दिलासा द्या; ठाकरे गटाचे जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

Subscribe

नाशिक : नाशिक शहर जिल्हयाच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून या पावसामुळे शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असतांना आता अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकर्‍यांना मदत द्यावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

ठाकरे गट नाशिकच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे कांदा, लसूण, गहू, हरभरा, भाजीपाला, द्राक्ष, डाळींब आदी पिकांसह आंब्याचा मोहर गळून पडल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरांसाठी साठवून ठेवलेला चाराही संपूर्णपणे पावसात भिजल्याने खराब झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयाच्या सुरूवातीलाच चारा नष्ट झाल्याने आगामी काळात चाराटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. रब्बी हंगामातील कांदा पीक शेतकर्‍यांनी शेतातच काढून ठेवले असून कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सचिन मराठे, विरेंद्रसिंग टिळे, दत्ता गायकवाड , डी.जी.सुर्यवंशी, महेश बडवे, नितीन जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -