घरमहाराष्ट्रनाशिकजनतेचे आशीर्वाद असल्यास राज्याचेही नेतृत्व करू - आदित्य ठाकरे

जनतेचे आशीर्वाद असल्यास राज्याचेही नेतृत्व करू – आदित्य ठाकरे

Subscribe

मुख्यमंत्रीपदासाठी यात्रा नसल्याचा निर्वाळा

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा कोणतेही पद मिळवण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे नियोजन केलेले नसून, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी जनतेचे आशीर्वाद मिळावेत म्हणून ही यात्रा काढण्यात आल्याचा निर्वाळा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (दि.20) नाशिकमध्ये दिला. येत्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही सर्व माझ्यासोबत असाल, तर हा शिवधनुष्य पेलण्याची माझी तयारी असल्याचे सांगत ठाकरे यांनी जणू महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचीच तयारी दर्शवली.
महाराष्ट्राला बेरोजगारी, दुष्काळमुक्त करून सुजलाम, सुफलाम करण्याचे ‘व्हिजन’ ठेवूनच या जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ उत्तर महाराष्ट्रातून केला आहे. उत्तर महाराष्ट्राने शिवसेनेला नेहमीच मोठे बळ दिले आहे.

राजकीय व्यासपीठावर पहिले पाऊल ठेवल्याचे छायाचित्र नाशिकमधील असल्याचे सांगत ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश असल्याने आनंद झाल्याचे येथे म्हटले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि.18) जळगाव येथून जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात केली. शनिवारी ही यात्रा नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथमत: त्र्यंबक राज्याचे दर्शन घेतले. यानंतर नवीन नाशिकमधील खुटवड नगर येथील सिध्दी हॉलमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावरुन खाली उतरत थेट कार्यकर्त्यांमध्ये मिसळत संवाद साधला. महाराष्ट्रावर भगवा झेंडा भडकवण्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी हवी. कार्यकर्त्यांची साथ असेल तर तुमच्यापेक्षा पाच पटीने अधिक मेहनत घेण्याची माझी तयारी आहे. बेरोजगारी व दुष्काळमुक्त बदलता महाराष्ट्र घडवण्यासाठी ही जनआशीर्वाद यात्रा असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

जनतेचा आशीर्वाद हवा-संजय राऊत

राज्यातील युवकांना आदित्य ठाकरे यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी ठाकरेंकडे महाराष्ट्राविषयी व्हिजन तयार आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव आम्ही ठरवलयं; पण महाराष्ट्राच्या जनतेनी त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे. त्यांच्या आशीर्वादावरच मुख्यमंत्री ठरणार असल्यामुळे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची खरी जबाबदारी राज्यातील जनतेची असल्याचे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा नाशिकमध्ये पुर्नउच्चार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -