नाशिकमध्ये उद्यापासून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

शाळांमध्ये एकही रुग्ण सापडल्यास शाळा होणार बंद, पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून, त्याचाच भाग म्हणून १८ जुलैपासून सर्व राजकीय, शासकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे मोर्चे, आंदोलने यांवरही बंधने येणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत भुजबळांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात १ हजार २४ शाळांपैकी ३३५ शाळा सुरू होणार आहेत. त्यातल्या काही सुरू झाल्या आहेत. सर्व नियम पाळून वर्ग भरतील. कोरोनामुक्त गावांमधील शाळेत एकही नवा रुग्ण सापडला तर ती शाळा लगेचच बंद केली जाईल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. व्यापार्‍यांकडून वेळ वाढवून देण्याची मागणी केली जात असली तरीही ते शक्य नाही. यापुढे दुकाने बंद करण्याचा वेळ दुपारी ४ वाजेचाच असेल. तसेच, वीकेण्ड लॉकडाऊन कायम राहील आणि पर्यटनस्थळांवर जमावबंदी कलम लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचंही पालकमंत्री भुजबळांनी यावेळी जाहीर केले.