इगतपुरीत बिबट्याच्या हल्ल्यात रेल्वे कर्मचारी जखमी

पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या घटनेने सह्याद्रीनगर भागात दहशत

Leopard attacked young farmer

इगतपुरी : दिवाळीत बिबट्याची दहशत कमी झालेली असतानाच मंगळवारी (दि. ९) पुन्हा बिबट्याने एका रेल्वे कर्मचार्‍यावर हल्ला करत दहशत वाढवली आहे. पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या घटनेने सह्याद्रीनगर भागात दहशत माजवली आहे. यापूर्वी पिंजरे लावूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने नागरिकांत भीतीचे सावट आहे. तातडीने या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

सह्याद्रीनगर भागातील नारायण निकम यांच्यावर राहत्याघरी बिबट्याने हल्ला केला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. रॅक पडण्याचा आवाज आल्याने काय झाले हे बघण्यासाठी नारायण निकम हे पडवीत गेले असता हा हल्ला झाला. २ ते ३ फुटावर दबा धरून असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. निकम यांचा पाय फॅक्चर असतानाही त्यांनी हल्ला परतवून लावला. बिबट्याने परत झडप घातली असता रॅक त्यांच्यामध्ये आल्याने आवाज झाला. यावेळी त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने धूम ठोकली. जखमी निकम यांना येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा या भागात वावर असून, पिंजरा लावूनही बिबट्या पिंजर्‍यात येत नाही. इतक्या दिवस प्राण्यांची शिकार करणार्‍या बिबट्याने आता माणसांवर हल्ला सुरू केल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या आठ दिवसापूर्वी वन विभागाने येथे ट्रॅप कॅमेरे लावले असून कॅमेर्‍यात बिबट्याची मादी व सोबत दोन पिल्ले दिसून आली आहेत. त्यांच्या सर्व हालचालीची टेहळणी करून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी दिली आहे. या ठिकाणी वन विभागांचे वन परिमंडळ अधिकारी पोपट डांगे, भाऊसाहेब राव, दत्तू ढोन्नर, शैलेंद्र झुटे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जात सविस्तर आढावा घेतला.