रामकुंडासह गोदाकाठचे इतर कुंडदेखील काँक्रिटमुक्त करावे; गोदाप्रेमींची मागणी

Godavari river

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीतील रामकुंडासह उर्वरित १६ कुंड हे काँक्रीटमुक्त करावे यासाठी गोदाप्रेमी देवांग जानी हे लढा देत आहे. गोदावरी नदीचे पात्र काँक्रीटमुक्त करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेत तसे आदेश देखील आणले. परंतु लाल फितीचा महापालिकेचा कारभार त्या आदेशाला देखील फिरवतांना दिसत आहे.

महापालिकेच्या अखत्यारीत होणारे काम स्मार्ट सिटी कंपनीकडे वर्ग करून महापालिकेच्या अधिकार्‍यांनी आपले अंग बाजूला काढून घेतले. स्मार्ट सिटी कंपनी हि गोदापार्कसह गोदावरी नदीच्या आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करणार असल्याने महापालिकेने रामकुंडासह इतर कुंड काँक्रीटमुक्त करण्याचे काम स्मार्ट सिटीकडे वर्ग केले. परंतु स्मार्ट सिटी कंपनीकडून देखील सन २०२० पासून या काँक्रीटीकरण काढण्यासाठी बचावात्मक भूमिका आणि वेळ काढू पणा घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोदाप्रेमी संस्थेकडून स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना मंगळवार (दि.२१) रोजी निवेदन देण्यात आले.

नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने रामकुंड येथील सिमेंट काँक्रीट काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. या समितीत जिल्हाधिकारी, नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि नाशिक पोलीस आयुक्त यांचा समावेश करण्यात आला होता. सदरच्या समितीने निर्णय घेतला कि, केंद्रीय संस्था निरी आणि भूगर्भ सर्वेक्षण विभाग (GSDA) यांच्या सल्ल्याने रामकुंडातील काँक्रीट काढण्यात यावे. समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळताच देवांग जानी यांनी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी सुमंत मोरे यांची भेट घेत लक्षात आणून दिले कि, नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या दि.२७ जानेवारी २०२० च्या इतिवृत्तात गोदावरी नदी पात्रातील सिमेंट काँक्रीट काढायला निरीची हरकत नसून काँक्रीट काढल्याने नदीचा प्रवाह वाढेल अशा अहवाल निरीने स्मार्ट सिटीकडे सादर केलेला आहे. तसेच भूगर्भ सर्वेक्षण विभागाने रामकुंडा येथे दर्शवलेल्या ठिकाणावर स्मार्ट सिटी कंपनीमार्फत दि. १४ डिसेंबर २०२० रोजी ट्रायल बोअर घेण्यात आली असता तेथे त्यावेळी दीड इंची पाणी लागले. यावेळी ५ एचपीची जलपरी मोटर लावून सलग २४ तास परीक्षण केले असता एका मिनटाला ४१ लिटर पाणी येत असल्याचे स्मार्ट सिटीच्या रेकॉर्डवर आहे. यावरून सिद्ध होते की रामकुंड सह गोदापात्रात जिवंत जलस्त्रोत सुस्थितीत आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता गोदापात्र काँक्रीट मुक्त करावे अशी मागणी गोदाप्रेमी देवांग जानी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुदतवाढीचा सदुपयोग व्हावा 

स्मार्ट सिटी कंपनीला सहा महिने मुदत वाढ मिळालेली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे शिल्कक असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेतल्यानेच अनेक कामांना विलंब होत असल्याचे दिसून येते. तर गोदा प्रोजेक्ट अंतर्गत करावयाच्या कामांमधील अनेक काम रद्द झाली आहे.

विभागीय आयुक्त यांनी ८ दिवसापूर्वी रामकुंडातील काँक्रीट काढण्याचे आदेश दिलेले आहे. निरी आणि भूजल सर्वेक्षण विभाग ह्या दोन्ही संस्थांचा अहवाल २०२० मध्येच आलेला असून त्याला ३ वर्ष पूर्ण होत आहे. हा घटनाक्रम त्रिसदस्यीय समिती समोर स्मार्ट सिटीकडून मांडला गेला पाहिजे होता. विभागीय आयुक्त यांच्या आदेशावरून तरी लवकरात लवकर रामकुंडासह इतर कुंडातील काँक्रीट काढले पाहिजे. : देवांग जानी, गोदाप्रेमी