घरउत्तर महाराष्ट्ररंगपंचमीलाही महागाईचा तडाखा, दुपटीने वाढले रंगांचे भाव

रंगपंचमीलाही महागाईचा तडाखा, दुपटीने वाढले रंगांचे भाव

Subscribe

प्रमोद उगले । नाशिक

रंगपंचमी सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे रंगांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहे. रंगपंचमीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असल्या तरीही ग्राहकांमध्ये खरेदीचा फारसा उत्साह दिसून आला नाही. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पिचकार्‍यांच्या किंमती १० ते १५ टक्क्यांनी तर, रंगांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. लाल रंगाचा डबा २५ रुपयांवरून ५० रुपयाला झाला आहे. तसेच, कोरडे रंग दीडशे रुपये किलोवर गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरवाढ झाली असली तरीही यंदा बच्चेकंपनीमध्ये म्युझिकल शॉवर पिचकारीची विशेष क्रेझ आहे.

- Advertisement -

शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा, पंचवटीसह विविध ठिकाणी पिचकारी, रंग, गुलाल घाऊक विक्रेत्यांची दुकाने सजली आहेत. होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण आनंद, उत्साह आणि जल्लोषाचे प्रतिक असल्याने विक्रेत्यांना दरवर्षी चांगल्या व्यवसायाची अपेक्षा असते. यंदाही याच आशेने छोट्या व्यावसायिकांनी रंगपंचमीचे साहित्य दुकानात विक्रीसाठी ठेवले आहे. अनेक प्रकारच्या पिचकार्‍यादेखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बच्चेकंपनीसाठी डोरेमॉन, छोटा भीम, फायर, बंदूक, गॅस टाकी अशा प्रकारच्या पिचकार्‍या ५० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. याशिवाय बंदुकीसारख्या दिसणार्‍या पिचकार्‍या, रंगांपासून बचाव करणारे मुखवटे, टोपी आणि टी-शर्टचे विशेष आकर्षण आहे. पाण्यात विरघळणारे लाल, हिरवा, निळा अशा रंगांचे डबे, पॅकबंद पाकिटे यासोबतच फळांपासून तयार केलेले हर्बल फ्रूट कलर बाजारात उपलब्ध आहेत.

म्युझिकल शॉवर पिचकारीचे आकर्षण

मोठ्या बंदुकीप्रमाणे दिसणारी खास म्यूझिकल पिचकारी पहिल्यांदाच बाजारदाखल झाली आहे. बंदुकीसारखे ट्रीगर दाबताच होळीच्या गाण्यासोबत रंग उडवणारी शॉवर पिचकारी पहिल्यांदाच आल्याने ती बच्चे कंपनीचे खास आकर्षण ठरत आहे.

यंदा रंगाचे भाव वाढल्याने ग्राहकांचा संमिश्र प्रतीसाध मिळत असून धीम्या गतीने रंगाची विक्री चालू आहे. अनेक पालक मुलांच्या हट्टापोटी महागडया पिचकार्‍या खरेदी करताना दिसत आहेत. : उमेश शिंदे, विक्रेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -