घरमहाराष्ट्रनाशिकगरुड अन् श्वेत पुच्छ टिटवीचे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात प्रथमच दर्शन

गरुड अन् श्वेत पुच्छ टिटवीचे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात प्रथमच दर्शन

Subscribe

भारतीय पक्षीतीर्थ म्हणून मान्यताप्राप्त नांदूरमध्यमेश्वरमध्ये यंदाच्या हंगामात पांढर्‍या शेपटीचा गरुड आणि श्वेत पुच्छ टिटवी हे पक्षी आढळून आले आहेत. नांदूरमध्यमेश्वरमध्ये हे दोन्ही पक्षी प्रथमच आढळून आल्याने पक्षिमित्र आनंदोत्सव साजरा करीत आहेत. यातील पांढर्‍या शेपटीच्या गरुडाचे महाराष्ट्रातील हे पहिलेच आगमन असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी अधिवासाची संपन्नता तसेच दुर्मिळ पक्षांचेे अस्तित्त्व लक्षात घेऊन हे क्षेत्र ‘भारतीय पक्षितीर्थ जाळ्या’त समाविष्ट केले आहे. प्लेमिंगो, टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शॉवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस्, गज, पेलिकन, गॉडविट, सॅन्ड पायपर, क्रेक, कर्ल्यु, हॅरियर, प्रॅटिनकोल, गल आदी स्थलातंरित पाणपक्षी येथे जास्त प्रमाणात आढळून येतात. पाणकोंबडी, मुग्ध बलाक, गायबगळे, मध्य बगळे, खंड्या, आयबीस, स्टॉर्क आदी स्थानिक पक्षी येथे सातत्याने दिसून येतात. पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर, कुट आदी स्थानिक स्थलांतरित पक्षीही येथे आढळून येतात. यंदाच्या हंगामात पांढर्‍या शेपटीचा गरुड आणि टिटवी हे दोन पक्षी प्रथमच दिसून आले आहे. तशी नोंदही वनविभागाच्या दप्तरी करण्यात आली आहे. या पक्षांना बघण्यासाठी देशभरातून पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार नांदूरमध्यमेश्वरला आले आहेत. यामध्ये काही विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.

Garud
दुर्मिळ गरुड

पांढर्‍या शेपटीचा गरुड

  • स्कॉटलंडच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवर हा पक्षी एरवी आढळून येतो
  • लुप्तप्राय जातीमध्ये समावेश असणारा पक्षी
  • हा पक्षी २० ते २५ वर्ष जगतो आणि त्याचे वजन तब्बल चार ते पाच किलो असते

पांढर्‍या शेपटीची टिटवी

  • हा पक्षी जलाशयाजवळ दलदल किंवा चिखलात, गवतात आपले भक्ष्य शोधताना दिसून येतो.
  • या पक्ष्याच्या शेपटीची बाजू पांढरी असल्याने याला व्हाईट टेल्ड लँपविंग म्हणतात.
  • सामान्य टिटवीपेक्षा आकाराने थोडा लहान व लांब पिवळे पाय असतात.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचेही शिक्कामोर्तब

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अभ्यासक नंदकिशोर दुधे आणि त्यांच्या टीमने काही दिवसांपुर्वी या अभयारण्याला भेट दिली होती. त्यावेळी हा पक्षी दिसला होता. त्याचा अभ्यास करुन तो पांढर्‍या शेपटीचा गरुड असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. – प्रा. आनंद बोरा, पक्षी अभ्यासक

- Advertisement -

पक्षांसाठी पोषक वातावरण

नांदूरमध्यमेश्वरमध्ये नवनवीन पक्षी आता दिसत आहेत. पक्षांसाठीचे पोषक वातावरण, मुबलक पाणी आणि खाद्य यामुळे येथे पक्षी आकर्षित होत आहेत. यंदा प्रथमच आलेला पांढर्‍या शेपटीचा गरुड महाराष्ट्रात प्रथमच आल्याचा अंदाज आहे. – भगवान ढाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -