रामकुंडातील पाण्याने पुरळ आणि खाजेचा त्रास; नाशिकची प्रतिमा डागळतीये

नाशिक : रामकुंडातील पाण्यात असंख्य कीडे आढळत आहेत. स्नानासाठी पाण्यात उतरणार्‍या भाविकांच्या पायाला हे कीडे चिकटून बसत असल्याने यामुळे पुरळ आणि खाजेचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे रामकुंडातील पाण्यात उतरणे धोकदायक बनले आहे. यानिमित्ताने प्रदूषणाचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नाशिकला येणारे भाविक मोठ्या श्रध्देने पवित्र रामकुंडात स्नान करतात. परिसरात सकाळी होणार्‍या विविध प्रकारच्या श्राध्दविधींसाठी येणारे भाविक स्नान करून विधी करतात. सूर्याला अर्घ्य वाहतात. त्यामुळे सकाळी रामकुंडात स्नानासाठी गर्दी होत असते. या रामकुंडातील पाण्याच्या प्रदुषणाबाबत अनेकदा केवळ चर्चा केल्या जातात. मात्र, शुद्ध पाणी मिळण्याची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. अशात या पाण्यात पायाला चिकटणार्‍या किड्यांची समस्या गंभीर झाली आहे. रामकुंडात डुबकी घेऊन पैशांसह मौल्य वस्तू मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍या अनेक मुलांच्या पायांना हे कीडे चिकटल्याचे निर्दशनास आले. हे कीडे पायच्या त्वचेवर घट्ट चिटकून बसतात. ते चावल्याची जाणीव होत नसल्याचे मुले सांगत असली तरी ते पायातील रक्त शोषित असल्याचे त्यांच्या वाढत्या आकारावरून लक्षात येत आहेत.

चार वर्षांपूर्वी दर मंगळवारी दुपारनंतर रामकुंडातील पाणी काढून ते पूर्णपणे रिकामे केले जात असे. रामकुंडाचा तळ व पायर्‍या घासून स्वच्छ केल्या जात असत. त्यानंतर पुन्हा पाणी भरले जात असे. मात्र, आता ही स्वच्छता होत नाही. ७ फेब्रुवारीला रामकुंडाच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी रामकुंडातील अस्थींचा ढिगारा साचलेला आढळल्याने अस्थींचा विलय होत नसल्याचा विषय चर्चेत आला आणि दोन दिवस होणारी स्वच्छता एका दिवसात आटोपण्यात आली. त्यानंतर पुन्हा रामकुंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले नाही. येथील पायर्‍यांवर शेवाळ वाढले आहे. त्यामुळे पाय घसरुन पडण्याची शक्यता वाढत आहे. असे असताना पाण्यात उतरणार्‍यांच्या पायाला चिकटणारे कीडे ही मोठी समस्या उद्भवू लागली आहे. या किड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे जाणवत असल्याने त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.

नाशिकविषयी नकारात्मक भावना

गोदाघाटावरील सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा जर देशभरातून येणार्‍या लाखो भाविकांना निर्मळ, स्वच्छ आणि शुद्ध पाणी नदीपात्रात उपलब्ध करून द्यावे. या परिस्थितीमुळे भाविकांच्या मनात गोदावरी आणि नाशिकविषयी नकारात्मक संदेश जात आहे.