घरमहाराष्ट्रनाशिकआरडीसी तुम्ही रेनगेज कधी पाहिलाय का?

आरडीसी तुम्ही रेनगेज कधी पाहिलाय का?

Subscribe

आमदार डॉ. राहुल आहेर यांचा सवाल; अधिकार्‍यांची शरणागती

नाशिक : गुलाब चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांच्या मदतनिधी वाटपावरून बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. चांदवड तालुक्यात अतिवृष्टी होवूनही शासनाकडे मदतनिधीसाठी जो अहवाल पाठविण्यात आला त्यात पावसाची नोंदीत तफावत असल्यानेच तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप आ. आहेर यांनी केला. याबाबत खुलासा करणार्‍या निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना आपण कधी रेनगेज पाहिलयं का असा सवाल करत त्यांनी धारेवर धरले. आ. आहेरांच्या प्रश्नांवर समर्पक उत्तरे देऊ न शकलेल्या उपजिल्हाधिकार्‍यांनी अखेर शरणागती पत्कारली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या कारभारावर चांगलेच तोशेर ओढले. यावेळी गुलाब चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतनिधीवरूनही चांगलेच रणकंदन झाले. चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या मतदारसंघातील विविध मंडळात अतिवृष्टीच्या निकषानुसार ६५ मिलीमीटर पेक्षाही अधिक पाऊस नोंदवला गेला असतांना देखील केवळ मंडळनिहाय करण्यात आलेल्या चुकीच्या नोंदीच्या आधारे तालुक्याच्या शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शेतामध्ये गुडघ्याइतके पाणी असतांना तहसीलदार, कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना वारंवार सांगूनही नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील महागेजच्या यंत्रणेव्दारे करण्यात आलेल्या नोंदणीनूसार चांदवड तालुक्यातील काही मंडळांमध्ये ७० मिलीमीटर ते १११ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली तर प्रत्यक्ष मंडळामध्ये रेनगेजव्दारे मोजण्यात येणार्‍या पर्जन्य नोंदीमध्ये त्याच गावांमध्ये अवघा ३० ते ३२ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला इतकी तफावत कशी? असा सवाल करत आ.आहेर यांनी सभागृहात आकडेवारीनुसार पर्जन्य नोंदणीत झालेल्या तफावतीचे आकडे वाचले.

- Advertisement -

याबाबत त्यांनी अधिकार्‍यांकडे खुलासा मागितला. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे याबाबत खुलासा करत असतांना आमदार आहेर यांनी त्यांना मध्येच टोकत आपण कधी प्रत्यक्ष रेनगेज पाहिले आहे का असा सवाल केला. मात्र यावर निवासी उपजिल्हाधिकारी निरूत्तर झाले. ज्यांनी कधी रेनगेज पाहिले नाही त्यांच्याकडून तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय कसा मिळेल असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या कामकाजावर आ. आहेर यांनी ताशेरे ओढले. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय झाला असून जिल्हा नियोजन समितीतून किंवा शासनाकडून आपल्याला नुकसानग्रस्तांसाठी निधी मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत आपण पडताळणी करू असे आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले. मात्र पंचनामेच करण्यात न आल्याने पडताळणी कशाच्या आधारावर करणार असा सवाल करताच कृषीमंत्रीही निरूत्तर झाले.

जिल्हाधिकारी साहेब फोन उचला!

जिल्हाधिकारी आणि आ.आहेर यांच्यातही शाब्दीक बाचाबाची झाली. आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी जिल्हाधिकार्‍यांना वारंवार फोन करूनही ते प्रतिसाद देत नसल्याबाबत आहेर यांनी नाराजी व्यक्त केली. आमदारांना फोन करण्याची पद्धत नाही का असा सवाल त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना केला. मात्र याचा खुलासा करत असताना डॉ. आहेर आणि जिल्हाधिकार्‍यांमध्ये चांगलाच वाद पेटला.

State Agriculture Minister Dadaji Bhuseआपल्याकडे सर्कलनुकसार पावसाची नोंद केली जाते. ही वस्तूस्थिती आहे की काही ठिकाणी पावसाच्या नोंदीत तफावत आढळून येते. मालेगावमध्येही काही सर्कलमध्ये पाउस कमी पडला परंतु तेथे पंचनाम्यानुसार मदत प्राप्त झाली. त्यामुळे या तफावतीबाबत आपण पडताळणी करू.
                                        – दादा भुसे, कृषीमंत्री

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -