सावानातर्फे वाचकांना मिळणार ई-पुस्तके

दुर्मिळ 10 हजार पोथ्यांचे डिजिटायजेशन पूर्ण

Liabrary

वाचन संस्कृती टिकवण्यासह वाढवण्यासाठी सार्वजनिक वाचनालयार्ते विविध उपक्रम राबविले जात आहे. सार्वजनिक वाचनालयचा प्राण असलेला देवघेव विभाग माधवराव लिमये सभागृहात स्थलांतरीत करण्यात येत असताना अद्ययावत करण्यात आला आहे. प्रत्येक वाचकाला पुस्तकापर्यत जाता येईल व हवे असलेले पुस्तक निवडता येणार आहे. अद्ययावत देवघेव विभाग लवकरच वाचकांसाठी सुरु होणार असून, ई-पुस्तकालयाचीही सुविधा असणार आहे. सावानाने संस्कृती मंत्रालयाच्या राष्ट्रीय पांडुलिपी मिशन या प्रकल्पाअंतर्गत 10 हजार पोथ्यांच्या तब्बल ७ लाख पत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण केले आहे. 10 हजार पोथ्यांच्या तब्बल ७ लाख पत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण केले आहे. संदर्भ विभागातील ५० हजार पुस्तकांचेसुद्धा डिजिटायझेशनसाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती सावानाचे प्रमुख जयप्रकाश जातेगांवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जातेगावकर म्हणाले, सार्वजनिक वाचनालयाने साहित्य, कला, शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रमांनी सातत्याने योगदान दिले आहे. सावाना १८१ वर्षांचे जुने वाचनालय आहे. दोन लाखांवर ग्रंथसंपदा, संदर्भ विभाग, पोथी विभाग अशा वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींनी नटलेले आहे. वाचकांच्या मागणीनुसार पुस्तकांच्या ज्यादा प्रती वेळोवेळी घेण्यात येत आहेत. या पुस्तकात दडलय काय, हे फलकावरील सदर अनेक वर्षांपासून सुरु आहे. नवीन व काही जुन्या पुस्तकांचा परिचय थोडक्यात वाचकांना करुन देण्यात येत आहे. सावानात मुक्तविद्यापीठाचे बी.लिब. व एम.लिब.केद्र असून, सावानात संशोधन केद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे. सावानाची वेबसाईट तयार करण्याचे काम चालू आहे. नाशिकचे संपूर्ण दस्तऐवज जतन करण्याचे काम व सर्वांपर्यंत पोहचविणे हा उद्धेश आहे.

जुन्या देवघेव विभागात मुक्तद्वार विभाग व महिलांसाठी अद्ययावत अभ्यासिका सुरु करण्याचा प्रयत्न आहे. बालविभागामार्फत नवीन पिढी तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच शाळांच्या माध्यमातून विद्यार्थीपर्यत पोहोचण्यासाठी प्रयत्न आहे. बालभवनच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सावानास उपाध्यक्ष किशोर पाठक यांचे चिरंजीव प्रथमेश पाठक यांनी त्यांच्याजवळ असलेली ग्रंथसंपदा देणगी म्हणून दिली आहे. गांगल आजींनी स्वतः हाताने लिहिलेले अनेक धर्मग्रंथ सावानास देणगी देणार आहेत.
यावेळी कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहायक सचिव डॉ.शंकर बोर्‍हाडे, अर्थसचिव उदयकुमार मुंगी, सांस्कृतिक सचिव डॉ.वेदश्री थिगळे, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, नाट्यगृह सचिव अ‍ॅड. अभिजीत बगदे आदी उपस्थित होत

वाचकांना पुस्तकेही मिळणार घरपोच

सावानाचा लायब्ररी ऑन व्हील प्रकल्प लवकरच सुरु करण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यास नाशिक शहरात गाडी वाचकांच्या घरापर्यंत जाणार आहे. त्याव्दारे सावानाच्या सभासदांना आवश्यक असलेले पुस्तक मिळेल. सभासदारांना गाडीतच पुस्तक बदलता येणार आहे. गाडीचा मार्ग, गाडीची रचना, पासिंगचे काम सुरु आहे, अशी माहिती अ‍ॅड. भानुदार शौचे यांनी दिली.