बेशिस्त वाहनचालक होणार ट्रॅप, दंडही ऑनलाईन; ‘मे’ पासून नाशिकवर सीसीटीव्हीचा वॉच

नाशिक : शहरातील बेशिस्त वाहतुकीला चाप लावण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रमुख चौकांमध्ये ८०० कॅमेरे बसविले जात असून, त्यातील ३५ कॅमेरे सुरू झाले आहेत. उर्वरित यंत्रणा ही मे २०२३ अर्थात पुढील तीन महिन्यांत कार्यान्वित होणार असून, त्यानंतर मात्र पोलीस नसल्याचे पाहून सिग्नल मोडणार्‍यांना चांगलाच भुर्दंड बसणार आहे. या यंत्रणेमुळे शहरातील सिग्नल्स नियंत्रित करताना, प्रत्येक चौकात लक्ष्य ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आयटी कक्ष उभारला जात आहे.

स्मार्ट सिटीचे ३५ कर्मचारी व १५ पोलीस दिवसरात्र कॅमेर्‍यांवर देखरेख ठेवणार आहेत. त्यामुळे आत्तापासून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणार्‍या शहरातील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रमाद्वारे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, बेशिस्त वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. गेल्या वर्षात १ लाख ५३ हजार ४४२ वाहनधारकांना तब्बल ८ कोटी ६९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यामध्ये विना हेल्मेट ५५ हजार, विना सीटबेल्त ४५ हजार व नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करणारे २५ हजार वाहनचालक आहेत.

संपूर्ण शहर नजरेच्या एका टप्प्यात आणण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीकडून शहरात 8०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. यामध्ये फिक्स बॉक्स कॅमेरे व पॉइंट झूम कॅमेर्‍यांचा समावेश आहे. मे २०२३ अखेरपर्यंत शहरात आठशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा डेटा जतन केला जाणार आहे. शहरात आत्तापर्यंत ४६८ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी ३५ कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. संपूर्ण नाशिक शहराची सुरक्षा नजरेच्या टप्प्यात येण्याच्या अनुषंगाने स्मार्टसिटी कंपनीकडून बॅकअप सांभाळला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या बॅकअपच्या माध्यमातून नाशिक शहर पोलिसांना गुन्हेगारी घटनांवर नजर ठेवता येणार आहे.

ही आहेत स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वैशिष्टये
  • कॅमेर्‍यांव्दारे समजणार संशयितांचे वर्णन आणि हालचाली
  •  १०० मीटर अंतरापर्यंतचे दृश्य पाहण्याची कॅमेर्‍यांची क्षमता (360 डिग्री)
  •  शहराच्या कानाकोपर्‍यातील गुन्हेगारी घटनांवर लक्ष
  •  बेवारस वस्तूंची तात्काळ मिळणार माहिती
  •  एखाद्या चौकात गर्दी होताच कॅमेरे देणार अलर्ट
  •  ग्रीन कॉरिडॉरसह व्हीआयपी व्यक्तींसाठी अशोकस्तंभ ते मुंबई नाक्यापर्यंतचे सिग्नल्स कंट्रोल रुममधून बदलता येणार
  •  सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे कंट्रोल यंत्रणा स्मार्ट सिटी कार्यालय आणि पोलीस आयुक्तालयात. संपूर्ण फुटेजचे बॅकअप ९० दिवस राहणार
  •  २३ ठिकाणी स्पिकरव्दारे (पब्लिक अनाउन्समेंट) माहिती देण्याची सुविधा

स्मार्ट सिटीकडून चौकाचौकांत कॅमेरे बसवण्याचे काम सुरु आहे. सर्व कॅमेरे सुरु झाल्यानंतर बेशिस्त वाहनचालकांच्या वाहनांच्या नंबरप्लेट स्कॅन होवून ऑनलाईन दंड आकारला जाईल. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. : पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त (वाहतूक)

नाशिक शहरात मे २०२३ मध्ये ८०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल तसेच, गुन्हेगारांच्या हालचालींवर वॉच ठेवला जाणार आहे. कॅमेर्‍यांमुळे आजवर चोरीच्या सात घटना उघडकीस आल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्येही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा सर्वाधिक उपयोग होईल. : सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी नाशिक