नाशिक रेडझोनमध्येच; ऑरेंज झोनमध्ये जाण्याची आशा मावळली

केंद्र सरकारने देशातील जिल्ह्यांमधील करोना बाधीतांची संख्या व मागील २१ दिवसांमधील तेथील स्थिती हे निकष लावून लॉकडाउन काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय घेतला. त्यामधून नाशिक जिल्हा व महानगर पोलिका दोन्हींनाही सवलत मिळू शकली नाही. यामुळे नाशिक महापालिकेसह मालेगाव महापालिका आणि जिल्ह्याचा भागही रेड झोनमध्येच राहिला आहे. यामुळे लॉकडाउनमधून नाशिक जिल्ह्याला सवलत मिळू शकते, या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारी (दि.१) देशातील लॉकडाउन शिथील करण्यासंबंधीचे परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील कारोना बाधीतांंची संख्या व मागील २१ दिवसांमध्ये आढळलेले करोना बाधीत रुग्ण यावरून ग्रीन, ऑरेंज व रेड झोन जाहीर केले आहेत. त्यात एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले आहेत. सरकारच्या या नव्या निकषानुसार मागील २१ दिवसांमध्ये एकही नवीन रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट केले आहे व इतरांना रेड झोनमध्ये समाविष्ट केले आहे. याबरोबरच काही जिल्ह्यांमध्ये एका पेक्षा अधिक महापालिका असतील तर तेथील महापालिका क्षेत्र स्वतंत्र क्षेत्र म्हणून गृहीत धरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका व उर्वरित ग्रामीण भाग असे तीन भाग होत आहेत. या तीनही भागांमध्ये मागील २१ दिवसांमध्ये आजपर्यंत करोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मालेगाव महापालिका हद्दीत पावणे तीनशे, नाशिक महापालिका हद्द व ग्रामीण भाग येथे जवळपास २५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार नाशिक जिल्ह्यातील दोन्ही महानगर पालिका व ग्रामीण भाग या तिघांचाही रेड झोनमध्येच समावेश झाला आहे. ग्रामीण भागात वा नाशिक महापालिका हद्दीत मागील २१ दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळला नसता तर नाशिकचा ग्रामीण भाग अथवा महापालिका यांचा समावेश ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट होऊ शकला असता. मात्र, आता संपूर्ण नाशिक जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट झाल्याने नाशिकमधील नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवरील नियंत्रण कायम राहणार आहे.

ग्रीनझोनसाठी किमान ४२ दिवस

केंद्र सरकारने शुक्रवारी (दि.१) जाहीर केलेल्या नव्या निकषानुसार एखादा जिल्हा अथवा महापालिका क्षेत्रात मागील २१ दिवसांमध्ये एकही नवीन रुग्ण न आढळल्यास त्या भागाचा समावेश एका झोनने वरती येतो. म्हणजे मागील २१ दिवसांमध्ये एखाद्या भागात नवीन रुग्ण न आढळल्यास तो भाग रेड झोन असेल तर तो ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट होतो. तसेच तो झोन ऑरेंज असेल तर त्याचा समावेश ग्रीनझोनमध्ये समाविष्ट होऊ शकतो. यामुळे नाशिक महापालिका व नाशिक ग्रामीणभाग ग्रीनझोनमध्ये येण्यासाठी पुढील ४२ दिवसांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळता कामा नये, असा या परिपत्रकाचा अर्थ आहे.