दिलासा ! रेल्वे स्थानकातील रिक्षा व्यवसायाला लागणार शिस्त

नाशिक : येथील रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिकरोड पोलीस, वाहतूक शाखा व रिक्षा चालक-मालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गर्दीत प्रवाशांना त्रास होऊ नये व योग्य दरात प्रवास व्हावा यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत शिस्त लावण्याचे काम सुरू केल्याने प्रवाशांना शेअरिंग रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नाशिक मोठे तिर्थक्षेत्र पंचवटी, त्र्यंबकेश्वर, शिर्डी इ. भागांत रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरात देशभरातून दररोज हजारो भाविक प्रवाशी नाशिक शहरात येत असतात. या ठिकाणी हातोडा, नालंदा व सातभाई असे तीन रिक्षा स्टँड आहेत. दिवसा सुमारे तीनशे तर रात्री दीडशे रिक्षा उभ्या असतात. प्रवाशीभाडे मिळावे यासाठी रिक्षाचालकांची आपसांतील भांडणे नवीन नाहीत. त्याचप्रमाणे या स्टॅन्डच्या व्यतिरिक्त शहरातील इतर भागांतून येणारे रिक्षाचालक व स्थानिक रिक्षाचालक, संघटना यांच्यात नेहमीच वाद होत असतात. कधी बसचालक, वाहक आणि रिक्षा चालकांचे वाद पोलीस ठाण्यात पोहोचतात व त्यातून प्रवाशांना नाहक मनःस्ताप होतो.

या परिस्थितीवर यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे, निरिक्षक राजू पाचोरकर, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर डोंबरे यांच्या पुढाकारातून रिक्षा चालक-मालक संघटनेशी चर्चा करून बैठका बोलावून प्रवाशांच्या सोयीसाठी पर्याय सूचविण्यात आले. या पुढाकारामुळे शिस्तबद्ध सेवा देणे शक्य होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल. पोलीस चौकीसमोर एकलहरे, शिवाजी पुतळा येथून पूर्वेला जाणार्‍या सेवा देतात.