दुकाने, व्यावसायिक आस्थापनांसाठी वेळेचे निर्बंध हटवले

प्रशासनाचा निर्णय: प्रतिबंधाची अत्यंत कठोर व काटेकोर अंमलबजावणी होणार

प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील दुकाने व व्यावसायिक आस्थापनांसाठी आता वेळेचे निर्बंध मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे आता सकाळपासून दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र सम विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानूसारच दुकाने सुरू असतील या नियमात मात्र कोणतही सवलत देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संयुक्त बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

शहरातील वाढत्या करोना संसर्गास पायबंद घालण्याच्या दृष्टीने अधिकार्‍यांची महत्वपूर्ण आज बैठक झाली. लॉकडाउनमध्ये शिथिलता देतांना सर्व दुकाने सुरू करण्यात आली मात्र दुकाने आणि आस्थापनांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतचे वेळेचे निर्बंध मात्र कायम ठेवण्यात आले. परंतु सद्यस्थितीत शहरी भागात होणारी गर्दी करोना संसर्गाचे दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याने याबाबत तातडीने पाउले उचलणे गरजेचे असल्याने याबाबत चर्चा या बैठकीत झाली. शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी ही प्रामुख्याने दुकानांच्या वेळेवर असलेल्या मर्यादेमुळे दुकाने कमी काळ सुरू राहत असल्याने तसेच काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सम-विषम नियमामुळे एक दिवस बंद राहिल्याने नागरिक वस्तूंचा संचय करण्यासाठी गर्दी करीत असतात अथवा दुकानांना वारंवार भेटी देत असतात अशी बाब निदर्शनास आल्याने याबाबत शासकीय अधिसूचनेतील तरतुदीचा वापर करून दुकानांचा कार्यकाळ वाढल्यास गर्दी विखुरली जाऊन सोशल डिस्टंसिंग चे पालन होणे सुकर होईल असे सर्व मताने ठरवण्यात आले. यानतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून दुकाने आणि आस्थापनांच्या वेळेचे निर्बंध अखेर मागे घेण्यात आले आहे. मात्र कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. कंटेंटमेंट झोन क्षेत्रात लागू असणारे निर्बंध येणार्‍या काळात अत्यंत कठोरतेने अंमलात आणले जातील. तसेच ज्या व्यावसायांना, दुकानांना बंदी घालण्यात आली आहे, अशी दुकाने व आस्थापना सुरू असल्याचे आढळून आल्यास त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही बैठकीत ठरविण्यात आले.

* दुकाने व आस्थापनांना वेळेची मर्यादा नसेल.
* सम, विषमतेच्या निर्बंधातून किराणा दुकाने, वैद्यकीय सेवा वगळण्यात.
* कंटेंटमेंट झोन मधील निर्बंध अधिक कठोर करणार.
* सोशल डिसिटन्सीचे होणार कठोर पालन
* उल्लंघन झाल्यास दुकानदारांवर कारवाई होणार.
* बंदी घातलेल्या दुकानांनी निर्बंधांचे उल्लंघन केल्यास परवाने रद्द करणार.