नाशिक महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन : मनविसे

नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये छत गळणे, भिंती ओल्या होणे, वर्गात पाणी साचने, मोडकळीस आलेली बाक, भग्न अवस्थेतील स्वच्छतागृह ही परिस्थिती बहुतांश शाळांमध्ये कायम आहे. या धोकेदायक परिस्थितीतून मोठी दुर्घटनाही घडू शकते. याप्रकरणी तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे गुरुवारी (दि.१४) शिक्षणाधिकार्‍यांना निवेदनाव्दारे देण्यात आला.

नाशिक शहरात महापालिकेच्या अंतर्गत १२६ शाळांमधून जवळपास 30 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी नाशिक महापालिकेकडून या शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. तरीही, महापालिकेच्या शाळांची अवस्था दयनीयच आहे, असे निवेदन म्हटले आहे. यावेळी संदीप भवर, कौशल पाटील, ललित वाघ, अविनाश जाधव, रोहित जाधव, आदीसह मनसैनिक उपस्थित होते.