पांडवलेणी सर करताना जखमी झालेल्या महिलेला केले ‘रेस्क्यू’

पांडवलेणी डोंगरावर पाय घसरून पडलेल्या महिलेला रविवारी (दि.२७)सकाळी ११ वाजेदरम्यान इंदिरानगर पोलिसांसह शीघ्र कृती दल, अग्निशामक दलाने धाव घेत सुरक्षितरित्या ‘रेस्क्यू’केले. त्यांना उपचारार्ह्त रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्नेहल शैलेश बागड (वय २८, रा.जाधव संकुल, सातपूर) असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.२७) सकाळी ११ वाजेदरम्यान स्नेहल शैलेश बागड (वय २८, रा.जाधव संकुल, सातपूर) या कुटुंबियांसह रविवार सुटीचा आनंद घेण्यासाठी पांडवलेण्याच्या डोंगरावर आल्या. बागड कुटुंबिय लेण्यांच्या शिखरावर गेले होते. मात्र, या ठिकाणी तीव्र उतार व ठिसूळ भाग असल्याने स्नेहल बागड पाय घसरून मोठ्या अंतरावरून खाली पडल्या. त्यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबियांनी मदतीसाठी प्रयत्नांची धावपळ सुरु केली. त्यांनी इतरांना मदतीसाठी आवाज देत पोलिसांशीही संपर्क साधला. दरम्यान, त्याच वेळी वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या सदस्य शैला वाणी यांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या ग्रुपवर मेसेज देत सदस्यांना माहिती दिली.

इंदिरानगर पोलिसांनी बचाव संस्थाशी संपर्क साधला आणि अवघ्या अर्ध्या तासात दोघेजण तेथे पोहचले. अनेक सदस्य रविवार असल्याने इतरत्र ट्रेकला गेले होते. नागरिकांची जमवाजमव करून वैनतेयसोबत भोसलाची टीम घटनास्थळी पोहचली. शीघ्र कृती दल, अग्निशामक दल, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे आणि सहायक निरीक्षक सय्यद हे सहकार्‍यांसह घटनास्थळी आले. फोल्डिंग स्ट्रेचरद्वारे दीड तासाच्या परिश्रमानंतर स्नेहल बागड यांना पायथ्याला आणून तातडीने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. भरउन्हात राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये रोहित हिवाळे, चेतन खर्डे, सुजिन पंडित, संतोष जगताप, संतोष वाबळे, योगेश राहाडे, कृष्णा कर्डिले, ऋत्विक पाटील, किशोर थेटे, प्रशांत परदेशी यांच्यासह इंदिरानगर पोलीस आणि अग्निशामक दलाच्या सुमारे ३४ जणांनी भाग घेतला.