घरताज्या घडामोडीशालेय पोषण आहाराचे तांदूळ, डाळ वाटणार

शालेय पोषण आहाराचे तांदूळ, डाळ वाटणार

Subscribe

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे आदेश; जिल्ह्यात 40 टक्के साठा

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात नागरीकांना धान्य पुरवठा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले असताना आता त्याच धर्तिवर शालेय पोषण आहाराचे शिल्लक तांदूळ व दाळ वाटप केली जाणार आहे. शाळेतून प्रत्येक दिवशी त्याचे व्यवस्थितरित्या वाटप करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या व खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले जाते. यात पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात तांदळाची खिचडी मिळते. दाळींमध्ये हरभरा, मटका, मूगदाळ व तूरदाळीचा समावेश होतो. शाळा बंद होण्यापूर्वी म्हणजेच 13 मार्चपूर्वी जिल्ह्यातील 40 टक्के शाळांना धान्य पुरवठा करण्यात आला आहे.  पोषण आहारात तांदुळ व विविध प्रकारच्या दाळींचा समावेश होतो. शाळेत साठवण्यात आलेले धान्य आता गावातील गरजू नागरीकांना वाटण्याचे आदेश दिले जाहेत. त्याचे योग्य नियोजन करुन तातडीने वाटप केले जाईल.
शालेय स्तरावर उपलब्ध धान्य व कडधान्य हे शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती तथा पोषण आहाराचे काम पाहणारे शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी तथा पालक यांना सम प्रमाणात वाटप करण्याचे सूचित केले आहे. धान्य घेण्यासाठी एकाच दिवशी विद्यार्थी व पालक यांची गर्दी होणार नाही, यादृष्टीने टप्प्याटप्प्याने नियोजन करण्याबाबत सूचना केल्या आहेत. विद्यार्थी व पालक धान्य घेण्यास आल्यास त्यांच्यातील एकमेकांपासूनचे अंतर एक मीटरपेक्षा जास्त राहील याची काळजी घेतली जाणार आहे. शालेय स्तरावर धान्य व कडधान्य वाटप करण्याची पुर्व कल्पना जिल्हाधिकारी, पोलीस विभाग व तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका पोलीस स्टेशन यांना देण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीस देण्यात आल्याचे शिक्षण संचालकांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.   सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या आहेत.

धान्याची माहिती देण्याचे आदेश
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दोन लाख 76 हजार 740 विद्यार्थी शिकतात. त्यांना महिन्याला साधारणत: 285 क्विंटल तांदूळ व धान्यादी माल आवश्यकत असतो. तसेच खासगी शिक्षण संस्थांमधील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणार्‍या धान्याची माहिती तातडीने संकलित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -