आरटीओने नाकारले १३८० रिक्षाचालकांचे अर्ज

वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट आणि आधार क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये चुकीचे भरल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने नाकारले अर्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे रिक्षाचालकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २४ हजार १४३ रिक्षाचालकांपैकी ६ हजार ३१२ रिक्षाचालकांनी आर्थिक मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. मात्र, वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट आणि आधार क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये चुकीचे भरल्याने प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)ने १ हजार 380 रिक्षाचालकांचे अर्ज नाकारले आहेत. रिक्षाचालकांना चुकीचा क्रमांक दुरुस्ती करण्यासह पुन्हा अर्ज करण्याची सूचना आरटीओकडून देण्यात आली आहे.

राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसला आहे. रिक्षाचालक दररोज कमवील तरच रोज खाईल अशी परिस्थिती आहे. रिक्षाचालकांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने परवानाधारकांना १५०० रुपये मदत जाहीर केली. १६ डिसेंबर २०१५ नंतरचे सर्व परवानाधारक अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी आहेत. त्यासाठी ऑनालाईन प्रणाली तयार करण्यात आली. मात्र, रिक्षाचालकांचे बँक खात्यांशी आधार लिंक नसणे, ओटीपी येण्यात अडचणी, कोड वारंवार विचारला जात आहे आदी तांत्रिक अडचणींमुळे अनेक रिक्षाचालकांची नोंदणी झालेली नाही. शिवाय, दीड हजार रुपये महागाईच्या तुलनेत खूप कमी असल्याने अनेक रिक्षाचालक ऑनलाईन अर्ज करण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी, अवघ्या 30 टक्केच रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. आर्थिक मदत मिळवण्यासाठी योजनेचा लाभ रिक्षाचालकांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

आरटीओकडून ऑनलाईन प्रणालीमुळे पारदर्शी कारभार केला जात आहे. मात्र, काही रिक्षाचालक दुसर्‍याच्या परवान्याची कॉपी मिळवत अर्ज भरत पैसे लाटण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांचे अर्ज रद्द केले जात असल्याचेही समोर आले आहे.

                      Autorikshow

अर्ज भरताना अशी घ्या काळजी

  • परवान्याची प्रत अपलोड करावी.मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करुन घ्या.
  • आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले असल्याची खात्री करावी.
  • अर्ज भरताना परवानाधारक, वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार व
    बँके खाते क्रमांक अचूक नोंदवावा.
  • कुटुंब सदस्याच्या नावे परवाना हस्तांतरण करताना अर्जदाराने वारसा पर्याय निवडावा. अर्ज केल्यानंतर आरटीओ संकेतस्थळावर अर्जाची सद्यस्थिती समजू शकेल.
  • अर्ज नाकारल्यानंतर दुरुस्त्या कराव्यात.
  • अर्ज नाकारण्याचे कारण देत पुन्हा अर्ज करावा.
  • अर्ज भरताना अडचण आल्यास आरटीओ कार्यालय दूरध्वनी क्र.02412-221100 यावर संपर्क साधावा.

रिक्षाचालकांनी आरटीओ विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा. यामुळे त्यांच्या बँक खात्यात १ हजार ५०० रुपये जमा होतील.अर्ज भरण्यासाठी रिक्षा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सभासदांना सहकार्य करावे.
          – भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक