शिक्षक भरतीत नियमांची पायमल्ली

उमेदवारांमध्ये नाराजी: उमेदवारांची आज कागदपत्र पडताळणी

Teachers Recruitment
शिक्षक भरती

तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शिक्षक भरतीला मुहुर्त लागलेला असला तरी या भरतीत सरसकट उमेदवारांची निवड केल्यामुळे भरतीच्या निमयांची पायमल्ली झाल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला आहे. तसेच इंग्रजी व विज्ञान या विषयाचे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार न मिळाल्याचे परीक्षा परीषदेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवर नाराजीचा सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे.

शिक्षक होण्यासाठी आवश्यक डी. एड. व बी. एड. पदवी धारकांसाठी राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लागू केली. आजवर पाच वेळा ही परीक्षा घेण्यात आली तरी,एकदाही शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे या परीक्षेला काहीच अर्थ नसल्याची धारणा उमेदवारांमध्ये निर्माण होऊन त्यांनी परीक्षांकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. ‘टीईटी’चा प्रयोग अनुउत्तीर्ण झाल्यानंतर शासनाने अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी ‘टीईटी’चे गुण ग्राह्य धरले आणि डिसेंबर 2017 मध्ये ही परीक्षा पार पडली. आता त्याआधारे राज्यात 5 हजार 822 शिक्षकांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड केली आहे. कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांना थेट नियुक्ती दिली जात आहे. मात्र, शासनाच्या नियुक्ती आदेशानुसार ‘टीईटी परीक्षा-एक’ उत्तीर्ण उमेदवारांना इयत्ता पहिली ते पाचवीसाठी नियुक्त केले जाणार होते. तसेच ‘टीईटी परीक्षा-दोन’ उत्तीर्ण उमेदवारांना इयत्ता सहावी ते आठवी पर्यंत शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात येणार होते. त्यामुळे डी. एड. व बी.एड. या पात्रता धारकांचे वेगवेगळी गुणवत्ता यादी जाहीर करणे अपरिहार्य होते.

मात्र, शासनाने ‘टीईटी परीक्षा-दोन’ ही एकच परीक्षा सरसकट ग्राह्य धरुन त्याआधारे उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले आहेत. परिणामी, पहिल्या परीक्षेत जास्त गुण मिळालेले असताना उमेदवारांची नियुक्ती झालेली नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शासनाने भरती करताना सरसकट एकच परीक्षा ग्राह्य धरल्यामुळे आजवर घेण्यात आलेल्या परीक्षा केवळ नावालाच होत्या, असा त्याचा अर्थ गृहित धरला जात आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागातील (पेसा) अनुसूचित जातीच्या (एससी) तीन हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. तसेच सुमारे 3200 जागांची दुसरी गुणवत्ता यादी शुक्रवार (दि.16) रोजी प्रसिध्द केली जाणार होती. मात्र, ही यादी लांबणीवर टाकल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात 204 शिक्षक

नाशिक जिल्हा परिषदेस २०४ शिक्षक मिळाले आहेत. यात मराठी माध्यमचे २०२ तर, २ ऊर्द माध्यमाचे शिक्षक आहेत. या पात्र शिक्षकांची त्या-त्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कागदपत्रांची पडताळणी ही १३ ऑगस्टपासून करावी असे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार, या शिक्षकांनी मंगळवारी (दि.१३) जिल्हा परिषदेत कागदपत्रे पडताळणीसाठी दाखल झाले होते. मात्र, शिक्षण विभागाने ही पडताळणी सोमवार (दि.19) रोजी करणार असल्याचे सागंतिले.

पात्रता परीक्षाही रद्द!

शिक्षक होण्यासाठी व्यावसायिक पदवी आवश्यक असून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) किंवा अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे अपरिहार्य आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ही अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, परीक्षा परिषदेनी मान्यता न दिल्यामुळे डिसेंबरची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.