नाशिक : स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती शनिवार आणि रविवार दोन दिवसीय नाशिक दौर्यावर येत असून या दौर्या दरम्यान ते शेतकर्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच शेतकरी प्रश्नावर स्वराज्य पक्ष लवकरच आवाज उठवणार असल्याचे पक्षाचे राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी सांगितले. दरम्यान या दौरयात येवला, लासलगाव मतदारसंघात दौरा करून मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे.
शनिवार (दि.९) रोजी संभाजीराजेंच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र स्वराज्य भवन या संपर्क कार्यालयाचे सायंकाळी ५ वाजता स्वराज्य भवन,मुंबई नाका, या ठिकाणी उद्घाटन होणार असून त्या ठिकाणी उपस्थित जनतेला ते स्वराज्य चे आगामी व्हिजन व सुसंस्कृत महाराष्ट्राचे भविष्य या विषयावर संबोधित करणार आहेत. दौर्याच्या दुसर्या दिवशी (दि.१०) रोजी संभाजीराजे हे जिल्ह्यातील येवला लासलगाव मतदार संघाचा नियोजित दौरा करणार असून सुमारे या भागातील २५ गावांमध्ये स्वराज्य च्या शाखा अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे.
या दरम्यान ते अनेक शेतकरी कष्टकरी बांधवांच्या शेतातील बांधावर जाऊन प्रत्यक्ष असणार्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. यानंतर सायंकाळी ६ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील मैदानात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान आजची राजकीय परिस्थिती, शेतकरी कष्टकरी यांचे दुर्लक्षित असलेले प्रश्न यांसह सध्या महाराष्ट्रातील मुख्य पीक कांदा व त्यावर केंद्र सरकारने लावलेला चाळीस टक्के निर्यात कर यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी यातून मार्ग कसा काढता येईल त्याच बरोबर केंद्र सरकारने टॉमॅटोची आयात करून शेतकर्याला मिळणारा नफा बंद करून आत्महत्ये सारख्या गोष्टींना प्रवृत्त करणारा या सरकारच्या विरोधात स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवणार आहे. या सर्व कार्यक्रम निमित्ताने जिल्ह्यातील जनतेने मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वराज्य पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र, राज्य कार्यकारिणी, जिल्हा, शहर व तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.