Hanuman Chalisa: राज्यात दंगली घडवण्याचे इंटेलिजन्सचे गृहविभागाला इनपुट्स – संजय राऊत

Sanjay Raut

राज्यात मविआ वैफल्यग्रस्त आहे. अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केल्यानंतरही लोक अशांत व्हायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांची योजना अशी आहे की, हे भोंगे वाटायचे. मशीदीसमोर भोंगे वाटून तणाव निर्माण करायचा. यासाठी भोंगे लावण्यासाठी सुपाऱ्या दिल्या आहेत. यांनी भोंगे लावायचे आणि खरा ओवेसी येऊन नवहिंदु ओवेसीच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या. दंगली झाल्या की राजभवनातून कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावर केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारचे कुटील कारस्थान महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता ही कारस्थान आणि षडयंत्र उलथवून लावेल. राज्यात दंगली घडवण्याचे गृहमंत्रालयाला इंटेलिजन्सचे इनपुट्स आहेत. त्यानुसार राज्याचा पोलीस विभाग काम करत आहे, असा धक्कादायक खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकुणच हनुमान चालीसेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणाचा खुलासा केला.

हनुमान चालीसेच्या राजकारणाचा कोणताही परिणाम नाही

राज्यात हनुमान चालीसेच्या निमित्ताने घाणेरडे राजकारण करण्याचा परिणाम केला गेला. कोल्हापूर पोटनिवडणुकीवर याचा परिणाम होईल अशा पद्धतीने तणाव निर्माण केला. अशा कोणत्याही प्रकारचे तणावाचे मुद्दे मांडणाऱ्यांचे भोंगे जनतेने उतरवले आहेत. त्याचा कोणताही फायदा आणि उपयोग कोल्हापुरात झाला नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने राजकारण भाजप नवहिंदुत्ववादी ओवेसीकडून करू इच्छित आहे तसेच नवहिंदुत्ववादी एमआयएमकडून होत आहे, त्याचा कोल्हापूरचा निकाल हा प्रत्यय आहे.

यंदा रामनवमीला १० ठिकाणी दंगली झाल्या

विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदुत्वाची गर्जना करत पोटनिवडणूक जिंकली होती, याची आठवण मला झाली. शिवसेना प्रमुखांची भ्रष्ट कॉपी निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला. पण असे भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही, लोक स्विकारत नाही. त्यामुळे भोंगे तुमचे असले तरीही भोंग्यामागचे आवाज कुणाचे आहेत, हे कोल्हापुर उत्तरच्या जनतेने महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्व म्हणून दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव या प्रचंड बहुमताने जिंकून येत आहेत, हे स्पष्ट झाले आहे. हे भोंग्याचे राजकारण आजच संपले आहे. रामनवमी होऊन गेली, आज हनुमान जयंती आहे. दोन्ही उत्सव शांतपणे आतापर्यंत साजरे करतो आहोत. यावेळी १० ठिकाणी रामनवमीला दंगली झाल्या. याआधी कधीच रामनवमीला दंगली झाल्या नव्हत्या. पण ज्या राज्यात भविष्यात विधानसभा निवडणुका आहेत, त्याठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवाय्या हे काही जणांनी केले. हिजाबचा मुद्दा युपी निवडणुकीत संपल्यावर भोंगा, हनुमान चालीसेचा मुद्दा आला. हनुमान चालीसा वाचताना मी पाहिले, हनुमान चालीसा तोंडपाठ असायला हवी होती. हनुमान चालीसेतील पहिली दोन कडवीही पाठ नसतील. जे कुणी तथाकथीत हनुमान भक्त आहे, त्यांच्यापैकी अनेकांना राष्ट्रगीत म्हणता येत नाही.