घरमहाराष्ट्रनाशिकसंत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दिमाखात प्रस्थान

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दिमाखात प्रस्थान

Subscribe

टाळ, मृदंगाच्या गजरात ज्ञानबा, तुकोबाचा जयघोष

कोरोनामुळे यंदा पायी वारीला परवानगी नसल्याने सलग दुसर्‍या वर्षीही बसमधून पालख्या पंढरपुरकडे रवाना झाल्या. त्र्यंबकेश्वर येथूनही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहाटे पाच वाजता सजवलेल्या शिवशाही बसमधून पंढरपुरकडे प्रस्थान झाले. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिर ते कुशावर्त तीर्थापर्यंत पायी वारी काढण्यात आली. टाळ, मृदंगाचा गजर करत ज्ञानबा, तुकोबांच्या जयघोषात वारकरी या पायी वारीत सहभागी झाले होते.

दहा मानाच्या पालख्या पंढरपुरकडे रवाना होत असतात. परंतू यंदा कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली. पहाटे पाच वाजता निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना कुशावर्त तीर्थ येथे स्नान घालण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. भरपावसात विठूनामाचा जयघोष करत वारकरी या पायी वारीत सहभागी झाले होते. कुशावर्त येथे आरतीनंतर सजवलेल्या बसमधून पालखीने वाखारीकडे प्रस्थान कले. यंदा दोन बसमधून ४० वारकरीही रवाना झाले. दुपारी ४ वाजता पालखी वाखरी तळावर पोहचणार आहे. वारीत सहभागी झालेल्या वारकर्‍यांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात आली आहे. यावेळी आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संपत सकाळे, तहसीलदार दीपक गिरासे, प्रशासकीय समितीचे सदस्य तथा सहायक धर्मदाय आयुक्त कृष्णा सोनवणे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, माजी विश्वस्त पवन भुतडा, पुंडलिक थेटे, संजय महाराज धोंगडे, पंडित महाराज कोल्हे, ललिता शिंदे, संजीवन समाधीचे वंशपरंपरागत पुजारी अनिल महाराज गोसावी, जयंत महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, अविनाश महाराज गोसावी, सच्चिदानंद गोसावी, अद्वैत गोसावी, मानकरी व वारकरी भाविक उपस्थित होते.

यावर्षीही पावसाची हजेरी लागली आहे. दोन वर्षांपासून या कोरोनाच्या प्रभावामुळे माउलींच्या सोहळ्याला जाता येत नाही. तरीदेखील या आनंदात सहभागी आहे. ‘कोरोनाचे संकट जाऊ दे आणि पुढील वर्षी पायी वारी होऊ दे’ असेच साकडे आम्ही विठुरायाला घातले आहे. – वारकरी भाविक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -