नाशिक महापालिकेच्या कर्मचार्‍यास सातपूर भागात मारहाण

थकबाकी वसुली करण्यासाठी आठ हजार वसाहतीत गेले असताना देसाई नामक व्यक्तीसोबत झाले वाद

satpur NMC worker
नाशिक महापालिकेच्या कर्मचार्‍यास सातपूर भागात मारहाण

सातपूर – आनंद छाया परिसरात सातपूर विभागीय कार्यालयाचे पाणीपट्टी व घरपट्टी विभागाचे कर्मचारी प्रदीप खोडे हे थकबाकी वसुली करण्यासाठी आठ हजार वसाहत, सम्यक चौक येथे गेले असता देसाई नामक व्यक्तीसोबत वाद झाले. यात देसाई यांनी मनपा कर्मचारी प्रदीप खोडे यांना मारहाण केली. यात खोडे यांना जबर मार लागला असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सातपूर विभागीय कार्यालयातील कर्मचार्‍यांनी दोषींवर कडक कारवाई करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करत घटनेचा निषेध व्यक्त केला गेला. दरम्यान, या सर्व प्रकारात सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी मध्यस्थी करत कर्मचार्‍यांनी काम पुन्हा सुरळीत चालू करावे अशी विनंती केल्याने तासाभरात काम सुरू झाले. दरम्यान या सर्व घटनेसंदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.