नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर

नाशिक : गोदावरीसह जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आला असून, पुढील तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी पहिली ते बारावीच्या शाळांना सुटी जाहीर केली आहे.

याबाबतच्या सूचनाही त्यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत. तर ग्रामीण भागातील शाळांना मंगळवारी सुटी देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी दिली. मुख्याध्यापकांना लेखी आदेश मंगळवारी दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तीन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस अद्यापही कायम आहे. यामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. रस्तेदेखील खचल्यानेे विदारक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात गुरुवार (दि.14) पर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाल्यामुळे पुर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता विचारात घेवून मंगळवारी शाळांना सुटी देण्याचे आदेश दिले आहेत. नेमक्या किती दिवस शाळांना सुटी द्यायची याविषयी लेखी आदेश मंगळवारी दिले जातील. नदीच्या कडेला असलेल्या शाळांनी अतिदक्षता बाळगावी. : मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)