Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक स्कूल व्हॅन मिळेना, रिक्षावाल्यांचा ‘पोरखेळ’ थांबेना

स्कूल व्हॅन मिळेना, रिक्षावाल्यांचा ‘पोरखेळ’ थांबेना

Subscribe

विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक :  शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या ‘स्कूल व्हॅन’ चालकांची संख्या दोन वर्षांत अचानक कमी झाल्याने सध्या पालकांना ‘व्हॅन’च्या शोध घ्यावा लागत आहे. स्कूल व्हॅन मिळत नसल्याने रिक्षाचालकांची चांदी होत असली तरी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसविले जात असल्याने विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

कोरोनाकाळात बहुतांश स्कूल व्हॅनचालकांनी आपला व्यवसाय बदलला. तर काहींनी गाडी विकून रिक्षा घेतली. परिणामी आता शाळा सुरू होऊन महिना उलटला असला तरी बहुतांश विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालक पुरते वैतागले आहेत. शहरात विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूलबस व रिक्षांचा वापर केला जातो. मात्र, या वाहनांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. ज्या बसेससोबत शाळा विद्यार्थी वाहतुकीसाठी करार करते, त्या बसेसवाल्यांनाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. पण, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षावाले अशी कोणतीही जबाबदारी घेताना दिसत नाहीत. शहरातील रस्त्यांवर विद्यार्थी कोंबून भरलेल्या रिक्षा दिसतात. या रिक्षा विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी की त्यांना जीवघेण्या प्रवासाचा थरार देण्यासाठी, असा सवाल उपस्थित होतो आहे. शहरात बहुतांश विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी शाळांमार्फत केली जाते. ही वाहतूक करताना आवश्यक असलेले सुरक्षिततेचे उपाय किंवा नियमांचे पालन केले जात नाही. हजारो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून केवळ शाळा प्रशासन आणि रिक्षावाले आपला फायदा बघत आहेत.

धोकादायक वाहतूक रोखण्यासाठी अशी घ्या काळजी

- Advertisement -

विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक रोखण्यासाठी कारवाई हा तात्पुरता उपाय असतो. कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून पालकांनी प्रमुख शाळांच्या मुख्याध्यापकांना वारंवार पत्रव्यवहार करून, तसेच रिक्षाद्वारे विद्यार्थी वाहतूक करणार्‍यांना सुरक्षिततेची जाणीव करून द्यावी. सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीची जबाबदारी शाळा व्यवस्थापनासह पालकांचीदेखील आहे. थोडे अधिक पैसे गेले तरी चालतील, मात्र काटकसर म्हणून रिक्षाचालकांना विद्यार्थी कोंबण्याची परवानगी पालकांनी देऊच नये.

आरटीओचे नियम काय सांगतात?

आरटीओ कार्यालयाने शाळा तसेच स्कूल बसवाल्यांना काही नियम घालून दिले आहेत. यात प्रामुख्याने स्कूलबसच्या खिडक्यांना जाळी असणे आवश्यक आहे. मात्र, हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच बसच्या खिडक्यांना सुरक्षारक्षक जाळ्या आहेत. बसमध्ये जेवढे सीट्स तेवढ्याच विद्यार्थ्यांना बसविणे बंधनकारक असते. रिक्षांबाबत मात्र अशा नियमांचे पालन होत नाही.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -