घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशोध बेपत्ता मुलींचा : अखेर आकडेवारी आली समोर; नाशकात चार महिन्यात "इतके"...

शोध बेपत्ता मुलींचा : अखेर आकडेवारी आली समोर; नाशकात चार महिन्यात “इतके” बेपत्ता

Subscribe

नाशिक : शहरात जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत तब्बल 743 मुले-मुली व महिला व पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस आयुक्तालयाकडे झाली आहे. त्यापैकी 101 अल्पवयीन मुली व २२ मुले आहेत. तर, १८ वर्षांपुढील 620 महिला व 262 पुरुष आहेत. पोलिसांनी पारंपारिक व तांत्रिक पध्दतीने तपास करत 79 अल्पवयीन मुलींचा व ३८ मुलांसह 230 महिला व 163 पुरुषांचा शोधून काढले.

राज्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. राज्यात मार्च महिन्यात तब्बल २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यात दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत असून, बेपत्ता होणार्‍या मुली १८ ते २५ वयोगटातील आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. नाशिक शहरात मुली, महिलांसह मुले व पुरुषही बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत अल्पवयीन मुलेमुली बेपत्ता झाल्याचे ११७ गुन्हे दाखल झाले असून, या गुन्ह्यांमध्ये तब्बल १२३ जण बेपत्ता आहेत. बेपत्तामध्ये अनेक बहीण व भाऊ असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. उर्वरित बेपत्ता मुलेमुली व महिला व पुरुषांचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (अ‍ॅण्टी ह्युमन ट्रॅफिक युनिट), मध्यवर्ती गुन्हे शाखेसह पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

बेपत्ता झालेल्या मुली अल्पवयीन असतील तर पोलीस अपहरणाची नोंद केली जाते. अनेक मुलींना प्रियकर मुलाने धमकी देवून पळवून नेले आहे. बेपत्ता मुली व महिलांच्या नातेवाईकांनी नाशिक शहर पोलिसांनी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये, यासाठी अनेक मुलींचे कुटुंबियांनी पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचे टाळत असल्याचेही समोर आले आहेत. यापैकी काही तरुणी आणि महिला लग्न करून घरी परतल्या आहेत. अनेक मुलेमुली व महिला, पुरुषांनी पळून जाताना मोबाईल बंद केले आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत.

अनोळखींचा शोध घेण्याचे आव्हान

ज्या मुली आणि महिला घरी परतल्याच नाहीत, त्यांचा अद्यापपावेतो कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. कारण, मुली किंवा महिला प्रेमप्रकरणातून संपर्कातील मुलगा किंवा तरुणासोबत पळून गेल्या तर त्या तपास घेऊन लवकर सापडतात. मात्र, ज्या मुली किंवा महिलांना अनोळखी व्यक्तींनी पळवून नेले आहे, त्यांचा शोध घेणे अवघड होत आहे. या मुली किंवा महिलांची विक्रीसुद्धा केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

जानेवारी ते एप्रिलमध्ये बेपत्ता अल्पवयीन मुलामुलींची आकडेवारी
  • अल्पवयीन मुलेमुली बेपत्ता दाखल गुन्हे : ११७ 
  • बेपत्ता मुलामुलींची संख्या : १२३ 
  • बेपत्ता मुले : २२ 
  • बेपत्ता मुली : १०१ 
  • सापडलेल्या मुली : ७९ 
  • न सापडलेल्या मुली : ३८ 
जानेवारी ते एप्रिलमध्ये बेपत्ता महिला व पुरुषांची आकडेवारी
  • एकूण बेपत्ता महिला व पुरुष : ६२० 
  • बेपत्ता पुरुष : २६२ 
  • बेपत्ता महिला : ३५८ 
  • सापडलेल्या महिला : २३० 
  • सापडलेले पुरुष : १६३ 
  • न मिळून आलेल्या महिला : १२८ 
  • न मिळून आलेले पुरुष : ९९ 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -