पलंगाखाली लपवलेली तलवार जप्त; एकाला अटक

अवैधरित्या घरातील पलंगाखाली लपवून ठेवलेली धारदार तलवार नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जप्त करत एका तरुणास अटक केली. राहुल काळफ शेळके (वय २९, रा.कुमावत नगर, मखमलाबाद रोड, पंचवटी, मूळ रा. देवरपाडा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकमधील पोलीस अंमलदार रवींद्र बागूल यांना सोमवारी (दि.१०) कुमावत नगर, पंचवटी येथे राहुल शेळके यांच्याकडे अवैधरित्या एक तलवार असून, ती त्यांणी घरामध्ये लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी पथकास रवाना केले. त्यानुसार पथकाने सापळा रचून शेळके यांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने तलवार पलंगाखाली लपवून ठेवल्याची कबुली दिली. पथकाने त्यांच्या ताब्यातून तलवार जप्त केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.