कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्तारोको

नाशिक : कांद्याला भाव मिळाला पाहिजे, विमा कंपनीने रोखलेला पीकविमा, कृषी पंपाला दिवसाला वीज, थकित ऊसाची एफआरपी मिळावी इ. मागण्यांसाठी बुधवारी (दि.२२) माजी खासदार राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा-कळवण रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या भावनांविषयी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच, कांदा उत्पादक शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जवळपास एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे देवळा-कळवण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेतकरी एकजुटीचा विजय असो, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे.. अशा घोषणा देण्यात आल्या. तर, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

वीजपुरवठा सुरळीत करावा, कांद्याचे भाव ४०० ते ९०० रुपयांच्या खाली आले आहेत. केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करून ग्राहक हित जोपासण्यापेक्षा कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेऊन जास्तीत जास्त कांदा निर्यात करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी नोटीफिकेशन जारी करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, तालुका समन्वयक कुबेर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडीत निकम, नगरसेवक संतोष शिंदे, शहराध्यक्ष दिलीप आहेर, सचिन सूर्यवंशी, कांदा उत्पादक संघटनेचे जयदीप भदाणे, शिवाजी पवार आदींसह विनोद आहेर, महेंद्र आहेर, संजय सावळे, तुषार शिरसाठ, मधुकर पंचपिंडे, सुभाष पवार, कैलास कोकरे, पी. डी. निकम, प्रवीण निकम आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, परिविक्षाधीन तहसीलदार गौरी धायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना निवेदन सादर करण्यात आले.

आमदार आहेर यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

लाल कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या पार्श्वभूमीवर या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ५०० रुपये विशेष अर्थसहाय्य अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. बुधवारी (दि. २२) आ. डॉ. आहेर यांनी भेट घेत तसे निवेदन दिले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा कांदा उत्पादक आहे. मात्र, सध्या विक्री होत असलेल्या लाल कांद्यास केवळ ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. वाढते उत्पादन, परदेशी बाजारपेठांमधील बिघडलेली आर्थिक स्थिती, रशिया-युक्रेन युद्ध यामुळे कांद्याचे भाव घसरत असले तरी त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. केंद्र व राज्यशासन शेतकर्‍यांप्रति सकारात्मक असून, त्यासाठी निर्यात धोरण, नाफेड कांदा खरेदी व इतर मार्ग अवलंबिले जात आहेत. मात्र, सद्यस्थितीत कांद्याचे बाजारभाव अत्यंत कमी आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रति क्विंटल ५०० रुपये आर्थिक मदत देत त्यांना सहाय्य करावे व कांदा बाजारभावात सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.