लसीकरणासाठी ज्येष्ठांची परवड; नियोजनाचा अभाव

वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती न करता सरसकट लसीकरण करावे : डॉ. निकम

देवळा : देशात आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यास सुरूवात झाली. मात्र अनेक आरोग्यकेंद्रांवर वय वर्ष ६० पेक्षा वयस्क नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी लसीकरण केंद्रांवर सक्ती केल्याने लसीविना परतावे लागले. ज्येष्ठांना वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती न करता प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधीक्षकांनी तपासणी करत लसीकरण करण्याची मागणी मविप्र संचालक डॉ. विश्राम निकम यांनी केली आहे.

६० वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या व इतर आजाराने त्रस्त असणार्‍या नागरिकांना आरोग्य मंत्रालयाने तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या असे सांगितले आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १२) बुस्टर डोस दिल्या जाणार्‍या ठिकाणी सर्रास सर्वच साठी उलटलेल्या नागरिकांकडून आरोग्य कर्मचार्‍यांनी वैध्यकीय प्रमाणपत्राची मागणी झाल्याने अनेक ज्येष्ठांना लसीसाठी आपल्या खासगी डॉक्टरांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी धाव घ्यावी लागली.

बुस्टर डोस घ्यायला जाणार्‍या नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस ९ महिन्यापूर्वी घेतला असेल तर तिसर्‍या डोससाठी पात्र ठरणार आहेत. मात्र पात्र राहूनही अनेक ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी लस मिळाली नसल्याने माघारी परतावे लागले. शुगर, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगितले आहे.

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर ९ महिने दुसर्‍या डोसला झाले असेल अशा सर्वांनाच सरसकट लसीकरण करावे अन्यथा स्थानिक प्राथमिक आरोग्यकेंद्र व तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी ज्येष्ठांना वैद्यकीय प्रमाणपत्र देत लसीसाठी शिफारस करावी व ज्येष्ठांची होणारी हेळसांड थांबवत बुस्टर डोस घ्यावा अशी मागणी देवळा डॉक्टर असोसिएशयनचे माजी अध्यक्ष व मविप्र संचालक डॉ. व्ही. एम. निकम यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

आरोग्य मंत्रालयाने तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या असे पत्रात म्हटले असल्याने बुधवारी लसीकरण ठिकाणी आमचे ज्या डॉक्टरांकडे उपचार सुरु आहेत त्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र मागितले. त्यामुळे लसीसोबतच प्रमाणपत्रासाठी देखील हेलपाटे मारावे लागत आहेत. – भिका शेवाळे, नागरिक खामखेडा

अनेक ज्येष्ठांच्या मधूमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा आजारांचे उपचार मालेगाव, नाशिक, पुणे येथील खासगी डॉक्टरांकडे असल्याने आपल्या वैद्यकीय सल्ला व प्रमाणपत्रासाठी नागरिकांना हे हेलपाटे तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्रासदायक असून साठी उलटलेल्या नागरिकांना सरसकट लसीकरण करावे. प्रमाणपत्रासाठी सक्ती करण्यात येऊ नये. – डॉ. विश्राम निकम, संचालक मविप्र

आरोग्य विभागाच्या पत्रात आम्हाला इतर आजाराने त्रस्त असणार्‍या नागरिकांना आरोग्य मंत्रालयाने तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगितले आहे. त्यामुळे आम्ही खासगी वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र मागणी करत आहोत. – सुधीर पाटील, देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी