मेंढपाळ मायलेकांचा बंधार्‍यात बुडून मृत्यू

मेंढ्या चारत असताना बंधार्‍यात आंघोळीला गेलेला मुलगा कपारी तुटल्याने बुडाला. त्याला वाचविण्यासाठी आईने बंधार्‍यात उडी मारली. पाण्यातून बाहेर येता न आल्याने मायलेकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.20) सकाळी 11.30 च्या सुमारास सिन्नर तालुक्यामधील मिठसागरे शिवारातील जामनदीवरील जाधव बधार्‍यात घडली. पिंट्याबाई बाळू राऊत (36) व गोविंद बाळू राऊत (17, रा. मिठसागरे, ता. सिन्नर) अशी मृत मायलेकांची नावे आहेत.

पिंट्याबाई मुलासमवेत गुरुवारी सकाळी मिठसागरे शिवारात मेंढ्या चारत होत्या. त्यावेळी गोविंदला जामनदीवरील बंधार्‍यात पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली. काठावर कपडे काढून तो बंधार्‍याच्या एका कपारीवर उभा राहीला. त्यावेळी त्याची आई त्याला पाहत असतानाच कपार तुटल्याने तो पाण्यात बुडाला. त्यांनी त्याला वाचविण्यासाठी बंधार्‍यातील पाण्यात उडी मारली. पाण्यातून बाहेर येता न आल्याने दोघेजण बुडाले. मेंढ्या गोरख कासार यांच्या शेतजमिनीवरील पिकात आल्या. मात्र, त्यांच्या मागे मेंढ्या वळणारा कोणीही दिसत नसल्यामुळे कासार यांनी तत्काळ गोविंदच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईलच्या रिंगचा आवाज बंधार्‍याच्या काठावरुन आला. त्या ठिकाणी त्यांनी जात पाहणी केली असता त्यांना गोविंदचे कपडे दिसले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले असता दोघेही तरंगताना दिसून आले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.