घरमहाराष्ट्रनाशिकशिंदे गटाचे ‘मिशन इलेक्शन’

शिंदे गटाचे ‘मिशन इलेक्शन’

Subscribe

संपर्कप्रमुखांनी संघटनात्मक आढावा, बूथ रचना, नियुक्त्या करण्याचे आदेश

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांनंतर राज्यातही निवडणूक तयारीला वेग आला आहे. भाजप पाठोपाठ आता शिंदे गटानेही लोकसभा, विधानसभा निवडणूकांसाठी कंबर कसली असून शिंदे गटाने नुकत्याच निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या नियुक्त्या जाहीर होताच संपर्कप्रमुख, निरीक्षकांनी नाशिकमध्ये दाखल होत पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला. तसेच विधानसभा निहाय आढावा या बैठकीत घेण्यात आला.

शिंदे गटाच्या उत्तर महारारूट्र संपर्कप्रमुखपदी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तर नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयात बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना भाऊसाहेब चौधरी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत ‘मिशन ४८’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले आहे. या माध्यमातून लोकसभेच्या सर्व ४८ जागावर लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागा असे आवाहन त्यांनी पदाधिकार्‍यांना केले. यावेळी पदाधिकारी नियुक्त्या, बूथ रचना, बूथ प्रमुखांची नेमणूक याचा आढावा घेण्यात आला.

- Advertisement -

शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जनतेसाठी केलेली कामे त्यांच्यापर्यंत पोहचवत आहेत. आपापल्या मतदारासंघातही सरकारी योजना, सरकारच्या कामकाजाबाबत माहिती शेवटच्या घटाकापर्यंत पोहचण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सह संपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, महिला आघाडी जिल्हा सह संपर्क प्रमुख सुवर्णा मटाले, महानगर संघटक अस्मिता देशमाने, सचिन भोसले, अमोल सूर्यवंशी, प्रमोद लासुरे, रोषण शिंदे, आनंद फरताळे, विशाल खैरनार, भिवानंद काळे, सनी रोकडे आदी उपस्थित होते.

नाशिक लोकसभेवर दावा

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजपची बार्गेनिंग पावर वाढल्याने भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. सध्या या मतदारासंघात शिंदे गटाचा खासदार आहे. परंतू नाशिकच्या जागेच्या बदल्यात अन्य एका जागेवर तडजोड करून नाशिकची जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. परंतू शिंदे गटानेही नाशिक लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असल्याचे आजच्या बैठकीतून दिसून येते.

- Advertisement -

सदस्य नोंदणी सुरू

शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून प्रत्यक्ष सदस्य नोंदणी अर्ज भरून देणे किंवा ७७०३०७७०३० या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन येणार्‍या लिंकवरील फॉर्म भरून पक्षाचे सदस्यत्व घेणे किंवा क्यूआर कोड स्कॅन करून फॉर्म भरून त्यानंतर ओळखपत्र डाऊनलोड करून सदस्यत्व, घेणे असे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -