शिंदे समर्थक शिवसैनिक म्हस्के यांचा जल्लोष

नाशिक : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश म्हस्के यांच्यासह शिंदे समर्थकांनी नाशिकमध्ये जोरदार जल्लोष साजरा केला. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच त्यांनी नाशिकरोड येथील संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव
साजरा केला.

शिवसेनेचे बंडखोर नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख निर्माण होत असताना योगेश म्हस्के यांनी हिंमत दाखवत आंबेडकर नगर परिसरात समर्थनार्थ फलक लावले होते. यानंतर हे फलक शिवसैनिकांनी फाडले तरी म्हस्के यांनी आनंदोत्सव कमी केला नाही. द्वारका चौकात त्यांनी समर्थनार्थ आंदोलनाची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करताच शिंदे समर्थकांनी सर्वदूर जल्लोष केला. यात नाशिकचे योगेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो डोक्यावर घेवून आनंदोत्सव साजरा केला.

ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत शिंदे समर्थकांनी गुलालाची उधळण केली. ‘शिंदे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांना पेढे भरवत शिंदे समर्थकांनी आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करुन घेतले.