शिर्डी विमानतळ अखेर रविवारपासून होणार सुरू

कोरोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून हवाईसेवा होती बंद

शिर्डी : कोरोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले काकडी येथील शिर्डी विमानतळ रविवार (दि. १०)पासून सुरू होणार आहे. त्यास शिर्डी विमानतळाचे संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी दुजोरा दिला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी देशभर लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून हे विमानतळ बंद होते. या विमानतळाची वाहतूक साईभक्तांवर अवलंबून असून, साई मंदिर बंद असल्याने साईभक्त शिर्डीकडे येत नव्हते.

आता मंदिरेही भाविकांसाठी खुली होणार असल्याने विमानसेवा सुरू होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाची विमाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पाईसजेट व इंडिगो एअरलाईन्स सुरुवातीला दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई याठिकाणची विमानसेवा सुरू करणार आहे. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता दिल्लीहून शिर्डी विमानतळावर पहिले विमान दाखल होईल. तर हेच विमान दुपारी १२.३० वाजता दिल्लीला रवाना होईल. दुपारी २.३० वा. हैद्राबादहून शिर्डी विमानतळावर विमान उतरेल तर पुन्हा दुपारी ३ वाजता हैद्राबादला रवाना होईल.

दुपारी ४ वाजता चेन्नईहून शिर्डी विमानतळावर विमान दाखल होईल. दुपारी ४.३० वाजता पुन्हा चेन्नईकडे रवाना होईल. विमान प्रवासासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. 18 महिन्यांनंतर विमानसेवा सुरू होत असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच काकडीतील वाहनधारकांच्या रोजगाराला पुन्हा चालना मिळणार असल्याने त्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. लवकरात लवकर शिर्डी विमानतळावरून पूर्वीप्रमाणे सर्व २८ विमानसेवा सुरू कराव्यात, अशी मागणी देशभरातील साईभक्तांसह अहमदनगरमधील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नाईट लँडिंगसाठी काम सुरु

शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडिंग सुरू होण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊन काळात नाईट लँडिंगसाठी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू होते. मात्र, काही अडचणींमुळे हे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण होताच दृष्यमानतेचा प्रश्न निकाली लागले. या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे लवकरच परिसरातील शेतकर्‍यांना आणि व्यापार्‍यांना माल आयात व निर्यातीसाठी फायदा होईल. विमानतळ सुरू झाल्यानंतर सर्वाधिक पसंती मिळालेले हे विमानतळ असून याठिकाणी आणखी अत्याधुनिक सुविधा वाढवणे गरजेचे आहे.