शिर्डी बंदची हाक

Shirdi-Sai-Baba-Temple-
शिर्डीचे साईबाबा मंदिर

शिर्डी संस्थानने ग्रास्स्थांना लागू केलेल्या जाचक नियमांविरोधात ग्रामस्थ एकवटले असून ३० जानेवारी रोजी गाव बंद ठेवून मोर्चा, उपोषणचा मार्ग अवलंबविण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीयांच्यावतीने कैलास कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, कमलाकर कोते, अभय शेळके, निलेश कोते यांनी दिला आहे.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाविकांना बाहेर जाण्यासाठी तीन व चार क्रमांकाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने साईमंदिराच्या पूर्वेला व दक्षिणेला असलेली बाजारपेठ अक्षरशः ओस पडली. व्यापारयांमध्ये असंतोष खदखदतो आहे. हे दरवाजे भाविकांना बाहेर जाण्यासाठी खुले करावेत. ग्रामस्थांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था करावी. भाविकांसोबतची लहान मुले व ज्येष्ठ मंडळींसाठी व्यवस्था करावी या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी बंदचा इशारा दिला आहे. जाचक नियम करून साईदर्शन गुंतागुंतीचे करून काहीही साध्य होणार नाही असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी समिती नेमून साईदर्शन व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करावे. ऑनलाईन पास मिळविण्याबाबतच्या त्रुटी दूर केल्या जातील. कोविडमुळे दर्शन व्यवस्थेत बदल झाले. त्यामुळे निर्माण झालेला असंतोष समजू शकतो. भाविकांना बाहेर पडण्यासाठी अन्य दरवाजे खुले करण्याची आपली तयारी आहे.

– कान्हूराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिर्डी संस्थान