शिवसैनिक हल्लाप्रकरण : सेनेची पोलिस महासंचालकांकडे धाव

पोलीस प्रशासनास योग्य त्या सूचना देण्याची मागणी

नाशिक : राज्यात शिवसेनेच्या पदाधिकारी व मान्यवर व्यक्तींच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सूडबुद्धीने त्रास देण्याचा हेतूने होत हल्ले असल्याचे दिसून येत आहे. या घटनांवर वेळीच आळा घातला नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. याप्रकरणी पोलीस प्रशासना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे करण्यात आली.

पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर अनोळखी व्यक्तींना हल्ला केल्यानंतर संजय मोरे, गजानन थरकुडे, संभाजी थोरवे, विशान धनवडे, चंदन साळुंके, राजेश पळसकर, सूरज लोखंडे, रूपेश पवार, अनिकेत घुले हे घटनास्थळी हजर नसतानाही त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर लावलेली कलमे काढून घ्यावीत. मूळ आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, असे डॉ. नीलम गोर्‍हे यांनी निवेदनात म्हटले आहे. नाशिक येथे निलेश सदाशिव कोकणे या शिवसेना कार्यकर्त्यावर अनोळखी व्यक्तींनी भररस्त्यात मारहाण केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे शिवसेना नाशिक संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे.

माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत यांना अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सावंत यांना कॉलवरही धमकी देण्यात आली. याप्रकरणी सावंत यांनी माथेरान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गन्हा नोंदवण्यात आला. या आगोदर देखील उद्धव ठाकरेंना समर्थन दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच त्यांनी जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. प्रसाद सावंत हे कर्जतला गेलेले असताना अज्ञातांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यातील जवळपास 8 ते 10 आरोपी हे अजूनही फरार आहेत. जीवघेण्या हल्ल्यातून बचावरेले प्रसाद सावंत हे सध्या माथेरानमधील घरी बेडरेस्टवर आहेत. डोंबिवली विष्णनगर पोलीस ठाण्यात विवेक खामकर यांच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ पैसे चोरल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे. खामकर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विवेक खामकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. खामकर यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पालीस कोठडी सुनावली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात एका महिलवर स्थानिक आमदारांनी मारहाण करण्याचा निदनीय प्रकार घडला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार अजय चौधरी, आमदार सचिन अहिर, शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांची स्वाक्षरी आहे.