घरमहाराष्ट्रनाशिकभुजबळांची पीए संस्कृती मोडीत काढा - सुहास कांदे

भुजबळांची पीए संस्कृती मोडीत काढा – सुहास कांदे

Subscribe

“आमदार पंकज भुजबळ यांनी तालुक्यावर लादलेली पीए संस्कृती मोडीत काढा. त्यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार तालुक्याची प्रगती केलेली दिसत नाही. शेजारच्या मतदारसंघाची प्रगती बघा आणि आपल्या आमदाराची कामगिरी बघा. तालुक्यात भीषण दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असल्याने आणि पाणी नसल्याने शेतातील उत्पन्न होत नसल्याने तालुक्यात शेतकरी आत्महत्या करीत आहे. मुलींचे लग्न होत नाही, मुले शाळेत जात नाही, अशा अवस्थेत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक संभ्रम अवस्थेत आहे”, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांच्यावर केली. नांदगाव येथील नव्या तहसील कार्यालयावर शिवसेनेचा धडक मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

हे वाचा – संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात नाशिकची बाजी

आम्ही सत्तेत असलो तरी पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी सांगितल्यानुसार शेतकर्‍यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरा, त्याच धर्तीवर आजचा हा शिवसेनेचा धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला असल्याचे कांदे यांनी सांगितले. माणिकपूंजच्या धरणाच्या पाण्याला हात लावता कामा नये. यासाठी रस्त्यावर उतरुन जेलमध्ये जाण्याची आमची तयारी असल्याचे माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले. आमदार पंकज भुजबळ आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मतदार संघात कुठलेच असे भरीव विकासाचे काम केले नसल्याचे देशमुख यांनी सांगून युती हो या न हो, आपल्या ताकदीने शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनही माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी केले.

- Advertisement -

तर संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी मोर्चाप्रसंगी धावती भेट देवून आपल्या मागण्या पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या मार्फत नक्कीच सोडविल्या जातील, असे सांगितले. त्याप्रसंगी बापूसाहेब कवडे, माजी सभापती विलास आहेर, नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, जि.प. सदस्य रमेश बोरसे, एकनाथ सदगीर यांनी आपले विचार मांडले. आजच्या मोर्चासाठी येथील जुने तहसील कार्यालयासमोर आज सकाळपासूनच शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने जमा होत होते.

हे देखील वाचा – ‘भाकप’ नाशिक लोकसभेसह चार विधानसभा लढविणार

मोर्चात शिवसैनिकांनी “मी कर्ज बाजारी, मी दुष्काळग्रस्त” हा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. तसेच ‘माणिकपूंज धरणाचे पाणी, आमच्या हक्काचे. नाही कोणाच्या बापाचे’, ‘कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे’, ‘बोंडअळीचे अनुदान मिळालेच पाहिजे’, ‘हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावेत’, ‘७/१२ उतारा कोरा करावा’ आदि मागण्यांचे फलक झळकवीत मोर्चा नवीन तहसील कार्यालयाकडे निघाला. शिवसैनिकांनी परिधान केलेल्या टोप्या आणि मी महागाई, मी भस्मासूर, मी कर्जदार, मी दुष्काळ असा मजकूर लिहिलेले काळे कुर्ते परिधान केलेले रस्त्याने जाणार्‍या येणार्‍यांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चा दरम्यान, शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे वाचन करुन तहसीलदार भारती सागरे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाचे सूत्रसंचालन विष्णू निकम यांनी केले. तर आभार मनमाड शहरप्रमुख मयुर बोरसे यांनी मानले. मोर्चास शिवसैनिक, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -