घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात सेनेत शाखाप्रमुखांची फळी

नाशकात सेनेत शाखाप्रमुखांची फळी

Subscribe

लवकरच नियुक्त्या; जिल्हा संपर्क प्रमुखांनी घेतला आढावा

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेत बदल झाल्याने बदलत्या प्रभाग रचनेनुसार शिवसेना आता प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र शाखाप्रमुख आणि प्रभागासाठी विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार असून, नवीन कार्यकारिणीत महिला आघाडीला स्थान देण्यात आले आहे.

जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी रविवारी (दि.16) शहरातील प्रमुख पदाधिकार्‍यांशी ‘वन टू वन’चर्चा केली. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे पदाधिकार्‍यांच्या रखडलेल्या नियुक्त्या त्वरीत दिल्या जातील. नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे आता शाखाप्रमुखांची नव्याने निवड करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कुठल्या प्रभागात कोणता कार्यकर्ता सक्रीय आहे, याची माहिती जाणून घेत त्यादृष्टीने अशा कार्यकर्त्यांची फळी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभी करण्यात येणार आहे. तीन नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने एका प्रभागासाठी एक शाखाप्रमुख असेल.

- Advertisement -

   त्या सर्वांची नियुक्ती करताना प्रभागातील लोकसंख्या, शिवसेना पक्षाची सद्यस्थिती काय? आगामी निवडणुकीत किती नगरसेवक त्या प्रभागातून निवडूण येऊ शकतात? यादृष्टीने चाचपणी केली जात आहे. शाखा प्रमुख व बुथप्रमुख यांची मजबूत फळी निर्माण करण्यासाठी नेत्यांचे मनोगत जाणून घेतले जात असल्याने नेत्यांच्या मर्जितील शाखाप्रमुखांची निवड केली जाऊ शकते. मात्र, सक्रीय कार्यकर्त्यांनाच नियुक्तीपत्र देण्याचा निर्धार या आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे नवीन नियुक्त्यांमध्ये महिलांचे संघटन अधीक मजबूत करण्याच्यादृष्टीने महिला शाखाप्रमुखही निवडल्या जातील. त्यांनाही पुढील आठवड्यात नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते, सुनील बागूल, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात आज उद्घाटन

महापालिकेसोबतच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुखांनी ग्रामीण भागाचाही आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव व निफाड तालुक्यात रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र दिले.

- Advertisement -

पक्ष प्रवेशाचा लवकरच धमाका

शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यादृष्टीने चाचपणी करुन आता फक्त तुल्यबळ उमेदवारांनाच ‘एन्ट्री’ देण्याची भूमिका शिवसेनेने स्विकारली आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख तथा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच मातोश्रीवर प्रवेश सोहळा होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर हा सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जाते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -