Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र पावसातही खरेदीचा उत्साह; गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

पावसातही खरेदीचा उत्साह; गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

Subscribe

नाशिक : गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असल्याने त्याआधी आलेल्या वीकेण्डच्या सुटीमुळे बाजारपेठेत गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईसाठी लाईटिंगच्या माळा, मखर अशा विविध वस्तू घेण्यासाठी बाजारपेठेत गणेशभक्तांची तोबा गर्दी झाली होती. मात्र, दुपारी अचानक आलेल्या दमदार पावसामुळे भाविकांची काहीशी धावपळ उडाली. अनेक नागरिक आपल्या लहानग्यांसह बाजारात आलेले होते. अनेकांनी वाहने शालिमार, रविवार कारंजा व गोदाकाठी लावून मेनरोड, दहीपूल, कानडे मारुती लेन या प्रमुख बाजारपेठा गाठल्या होत्या. त्यामुळे खरेदी केलेले साहित्य पावसापासून वाचवत सुरक्षित निवारा शोधण्यात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, सायंकाळी पावसाची उघडीप झाल्यानंतर बाजारपेठा पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेल्या होत्या.

 दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी (दि.१७) सलग तिसर्‍या दिवशीही शहरासह जिल्हाभरात हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसाने शहरातील वीकेण्ड शॉपिंगसाठी आलेल्या नागरिकांची काहीशी धावपळ उडाली. दुपारनंतर आलेल्या पावसामुळे धरणसाठ्यांमध्ये मात्र वाढ झाली. सप्टेंबरच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यात दमदार बरसून माघारी परतलेल्या पावसाने शुक्रवारपासून (दि.१५) पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. मागील पंधरवड्यात कडक ऊन असल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी अक्षरशः जळून गेल्यासारखी स्थिती होती.

- Advertisement -

उन्हाच्या झळा बसल्याने शेतातील कांदा, मका, बाजरी पीक पिवळे पडले होते. जिल्ह्यातील काही गावांना आजही टँकरच्या सहाय्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. मात्र, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना बर्‍यापैकी जीवदान मिळाले आहे. तसेच, धरणसाठ्यांतही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. हा पाऊस असाच कायम राहिल्यास दुष्काळाचे सावट दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही धरणे, तलाव, विहिरी कोरड्याठाक पडल्या असून, तेथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच आजही जिल्हावासियांना दमदार पावसाची आस लागून आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेला पाऊस कायम राहावा, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

धरणातून विसर्ग सुरुच; गोदाघाट पाण्याखाली

गंगापूर धरण क्षेत्र तसेच, पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातून शनिवारी (दि.१६) रात्री ८ वाजता 537 क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. तसेच, रविवारीही (दि.१७) पाऊस कायम राहिल्याने सायंकाळी ७ वाजता पुन्हा एकदा ११०६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरणातून करण्यात येणारा विसर्ग घटविण्यात आला असला तरी, शहरात संततधार सुरू असल्याने आजूबाजूच्या परिसरातून वाहून येणारे पाणी गोदावरी नदीपात्रात मिसळत असल्याने गोदाकाठावर पूरसदृश परिस्थिती कायम होती. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गदेखील वाढविण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले.

पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने उलटले असले तरीदेखील अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे आजही शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत आहे. अशातच गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपलाय. याच पार्श्वभूमीवर, ’बाप्पा येताना तू छत्री घेऊन ये, म्हणजेच भरपूर पाऊस पडू दे’ अशी मनोकामना मूर्तिकार मयूर मोरे यांनी या सुबक मूर्तीतून केलीय.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -