नाशिकच्या इस्कॉन मंदिरात ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ची धूम

नाशिक : द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरात यंदा कोरोना काळानंतर प्रथमच होत असल्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा अतिशय जल्लोषात होत आहे. तीन दिवस म्हणजेच १८ ते २० ऑगस्ट हा सोहळा होणार आहे.

जन्माष्टमी सोहळ्यास गुरुवारी दि.१८ पासून सुरूवात होणार आहे व सोहळ्याची सांगता शनिवारी (दि. २०) होणार आहे.
जन्माष्टमी निमीत्त मंदीराची तसेच श्री राधा कृष्णांच्या विग्रहांची सुंदर सजावट करण्यात येणार आहे. १८ तारखेला मंदिरात १२ तास हरिनाम कीर्तनाचे आयोजन केलेले आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे ५ वाजता मंगल आरती, ६ वाजता हरे कृष्ण महामंत्र जप, सकाळी ८ वाजता श्रीमद भागवत प्रवचन असणार आहे. भागवत कथेसाठी मुंबईहून श्रीमान व्रजविहारी प्रभू व श्रीमान नित्यानंद प्रभू येणार आहेत. दिवसभर दर्शन भाविकांसाठी उघडे राहणार आहे. श्री श्री राधा मदनगोपाल विग्रहांना नवीन वस्त्र परिधान करण्यात येणार आहेत व नयनरम्य अशी वेदीची सजावट देखील करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजेपासून पुन्हा विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री ११ वाजता पंचामृत अभिषेक तर ठीक १२ वाजता कृष्ण जन्म मुहूर्तावर महाआरती केली जाईल.

शनिवारी म्हणजेच २० ऑगस्टला श्रील प्रभुपदांचा १२६ वा अविर्भाव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीदेखील सायंकाळी ६ ते ९ विविध कार्यक्रम व महामंत्र कीर्तन होणार आहे. जन्माष्टमी निमित्ताने मंदिराबाहेर विविध धार्मिक ग्रंथांचे प्रदर्शन व विक्री तसेच विविध स्टोल्स देखील असणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उपाध्यक्ष सहस्त्रशीर्ष प्रभू, विग्रह सेवा प्रमुख गोपालानंद प्रभू, सजावट प्रमुख सार्वभौमकृष्ण प्रभू, मारुतीप्राण प्रभू, अक्षय एडके, सुमेध पवार, नादिया कुमार दास, तुलसी सेविका माताजी, श्रीमती दिवाकर, श्रीमती प्रिया गोरे, सत्यभामा कुमारी माताजी आणि इतर बरेच कृष्णभक्त अथक परिश्रम घेत आहेत. सर्व नाशिककरांनी या तीन दिवसीय कार्यक्रमास येऊन दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आग्रहाचे आवाहन इस्कॉन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.