घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रश्रीराम शेटेंनी पवारांना खोटे ठरवले ?

श्रीराम शेटेंनी पवारांना खोटे ठरवले ?

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिक दौरा करत श्रीराम शेटे यांच्या उमेदवारीवरुन जाहीर नाराजी व्यक्त केली. मी अतिशय दु:खी असल्याची भावना त्यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केलेली असताना बुधवारी (दि.10) नाशिकमधील मेळाव्यात श्रीराम शेटे यांनी आपण कुठल्याही प्रकारे नाराज नसल्याचे सांगत शरद पवारांना खोटे ठरवल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरु झाली आहे.

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी जोरदारपणे शक्तिप्रदर्शन केले. मेळाव्याच्या माध्यमातून परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी सत्ताधारी गटावर आरोपांची राळ उडवली. आरोपांची राळ खाली बसण्यापूर्वीच सत्ताधारी गटाने त्यांना जोरदारपणे प्रत्युत्तर दिले. सत्ताधारी गटाच्या प्रगती पॅनलने हा मेळावाच ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली घेतला. त्यामुळे त्यांचा विरोध राहिलेला नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मेळाव्यात बोलताना त्यांनी नाराजी नाट्यावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, मविप्र संस्थेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मी नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण मी कुठल्याही पदाची उमेदवारी मागितली नाही. नीलिमा पवार यांना दोनवेळा कोरोना झाल्यामुळे त्यांना निवडणूक लढवणे शक्य नसल्यामुळे त्यांनीच मला आग्रह केला की, तुम्हीच या संस्थेची धुरा सांभाळा. यावर मी स्पष्टपणे नकार दिला होता. मला कादवा कारखान्याचे प्रचंड काम असल्यामुळे संस्थेसाठी वेळ देवू शकत नसल्याचे मी स्पष्टपणे त्यांना सांगितले.

- Advertisement -

त्यांनतर नीलिमा पवार यांनी शरद पवारांकडे आग्रह धरल्यानंतर माझा नाईलाज झाला आणि मी सरचिटणीसपदासाठी तयार झालो. पण निफाड तालुक्याबाहेरचा सरचिटणीस कधी झालेला नाही. त्यामुळे आमच्यात कधी मतभेद नव्हते आणि राहणारही नाहीत, असा खुलासा शेटे यांनी केला. ते पुढे म्हणाले, कर्मवीरांनी प्रचंड कष्टाने संस्था उभी केली असून संस्थेत केजी टू पीजी शिक्षणाची सुविधा निर्माण केली आहे. डॉ. वसंतराव पवारांनी स्पर्धेच्या युगात संस्था टिकवून संस्थेचा आर्थिक स्तर उंचावला.

संस्था ही समाजाची ओळख असून संस्थेच्या विकासासाठी निलीमा पवार यांच्या आपण कायम सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. मविप्र संस्था ही समाजाची आहे. त्यामुळे सभासदांनी संस्थेचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन करण्यास ते विसरले नाहीत. पण शरद पवार ज्यावेळी नाशिकमध्ये आले होते त्यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त केलेली असताना श्रीराम शेटे यांनी नाराज नसल्याचे सांगून पवारांना खोटे ठरवल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरु झाली आहे. या प्रकरणानंतर श्रीराम शेटे निवडणुकीपासून दुर राहतील, असा अंदाज वर्तवला जात असताना त्यांनी व्यासपिठावरुन जाहीर भूमिका घेतल्यामुळे श्रीराम शेटेंच्या मनात नेमके काय सुरु आहे, याचा थांगपत्ताच मतदारांना लागत नसल्याचे ते सांगत आहेत. या प्रकरणामुळे निवडणुकीत रंगत अधिकाधिक वाढत चालली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -