घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिन्नर तालुक्यातील नांदूर-शिंगोटेत एकाच रात्री सहा दुकाने फोडून चोरी

सिन्नर तालुक्यातील नांदूर-शिंगोटेत एकाच रात्री सहा दुकाने फोडून चोरी

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे येथे मध्यरात्रीतून घडलेल्या घटनेत तब्बल सहा दुकानांचे शटर वाकवून चोरी करण्यात आली. या घटनेने प्रचंड दहशत पसरली असून, पोलीस यंत्रणेसह व्यापार्‍यांचीही झोप उडाली आहे. विशेष म्हणजे चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. यावरून चोरट्यांचा माग काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, कुठल्याही भीतीविना चोरट्यांचे वाढते धारिष्ठ्य अन् वाढत्या चोरीच्या घटना रोखण्याचेही आता आव्हान उभे राहिले आहे.

परिसरातील व्यावसायिकांच्या चिंतेत भर घालणार्‍या या घटनेत चोरट्यांनी तासाभरात निमोण नाका परिसरातील चार कृषी सेवा केंद्र, एक मेडिकल दुकान आणि एक जनरल स्टोअर्स अशी एकूण सहा दुकाने फोडली. येथील महारुद्रा जनरल स्टोअरचे संचालक दत्तात्रय सानप हे पहाटे ५ वाजेच्या सुमारास आपल्या दुकानाकडे फेरफटका मारण्यासाठी आले असता त्यांना त्यांच्या दुकानाचे शटर वाकलेले दिसून आले. त्यांनी अन्य दुकानांकडे पाहिले असता अन्य काही दुकानांचेही शटर वाकलेले त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच सहकारी दुकानदारांना चोरी झाल्याबाबत माहिती दिली. नांदूरशिंगोटे पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर यांनी पाहणी केली. यानंतर सर्व दुकानदारांचा पंचनामा करून माहिती घेतली. पुढील तपास वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तांदळकर करत आहेत.

- Advertisement -

6 ते 7 जणांचे टोळके

नांदूर शिंगोटे येथील स्थानिक दुकानदारांनी सांगितल्याप्रमाणे या चोर्‍या तब्बल 6 ते 7 जणांच्या टोळक्याने मिळून केल्या. यात सहाही दुकानांची शटर वाकवण्यात आली. मुख्य बाजारपेठेत 6 ते 7 जणांचे टोकळे बिनदिक्कत फिरते, शटर वाकवते, चोर्‍या करते, मग पोलीस काय करतात, असा संतप्त प्रश्न व्यापार्‍यांकडून उपस्थित केला गेला आहे.

ही दुकाने फोडली !

महारुद्रा जनरल स्टोअरमध्ये सहा हजार ३०० रुपयांची रोकड, साई मेडिकलचे शटर वाकवून रोख रक्कम २ हजार व इतर वस्तू, सागर ग्रो या दुकानातून २५० रुपयांची चिल्लर व रेणुका माता कृषी सेवा केंद्रातून १० हजार ५०० रुपयांची रोकड, गावापासून पुढे असणार्‍या सानप वस्ती या ठिकाणी लक्ष्मी ग्रोमधूून ४ हजार रोख व इतर शेती उपयोगी साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. शिवनेरी कृषी सेवा केंद्रात मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. सर्वच दुकानांमध्ये शटर वाकवून चोरट्यांनी प्रवेश करत हातसफाई केल्याचे दिसून आले.

- Advertisement -

रात्री बर्‍याचदा वीज जाते, याचाच फायदा घेऊन या चोर्‍या केल्या गेल्या. हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलीस यंत्रणेपुढे संबंधित गुन्ह्याचा तपास लावण्याचे मोठे आवाहन आहे. रोज दोन वेळेस पोलीस गस्त घातली जावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. त्याचबरोबर गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करत चोरट्यांचा कठोर शासन करावे, अशीही मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -