स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार; भरपावसात काँक्रिटीकरण

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात सुरू असलेल्या कामांवरुन सातत्याने टिका होत असतानाच या अनागोंदी कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. पावसाळ्यात सर्वप्रकारची रस्त्याशी संबंधित कामे बंद ठेवण्याचा नियम असतानाही, स्मार्ट सिटीकडून मात्र सोमवारी (दि.११) दुपारी भरपावसात काँक्रिटीकरणाचे काम सुरू होते.

गेल्या वर्षभरापासून गोदाघाट परिसरात स्मार्ट सिटी कंपनीकडून रामकुंड ते गाडगे महाराज पुलापर्यंत एक मोठी भुयारी गटार पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम आजही पूर्ण झालेले नाही. सोमवारी आलेल्या पुरामुळे गोदाघाट जलमय झालेला असताना अनेक व्यावसायिक आपल्या टपर्‍या आणि दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करत होते. यावेळी सरदार चौकात स्मार्ट सिटीने खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे मोठी अडचण येत होती. हे प्रकरण अंगलट येण्याच्या शक्यतेने कंपनीकडून घाईघाईत काम करण्याच्या नादात खोदलेला खड्डा भरपावसात सिमेंट काँक्रिटच्या सहाय्याने बुजवण्याचा प्रयोग सुरू होता. यात रस्त्याने पायी जाणार्‍या दोन युवकांचा तोल जाऊन ते त्या काँक्रिटमध्ये पडले. सुदैवाने कोणतीही त्यांना इजा झाली नाही. या कामामुळे व्यापार्‍यांना टपर्‍या आणि आपला माल स्थलांतरित करताना, तसेच पोलिसांना बॅरिकेड्स अन्यत्र नेताना लांबचा फेरा घ्यावा लागला. तसेच, वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला.

सिमेंट गेले वाहून, मुली पडल्या खड्ड्यात

स्मार्ट सिटी कंपनीने ज्या ठिकाणी काँक्रिटीकरण केले त्या ठिकाणचे काँक्रिट वाहून गेल्याचे मंगळवारी (दि.१२) दिसून आले. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा खड्डा पडला होता. या खड्ड्यात चक्क पोलिसांचे बॅरिकेड्स आडवे टाकल्याचे दिसून आले. एखादी व्यक्ती पाणी असताना या रस्त्याने गेली असती आणि जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण राहिले असते. गेल्या आठवड्यात असेच दोन अपघात स्मार्ट सिटीने खोदलेल्या रस्त्यांमुळे झाले. सीतागुंफा रोडवरील एका घटनेत दुचाकीचालक खड्यात पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. तर, मालेगाव स्टॅन्ड येथील दुसर्‍या घटनेत सायकलवरून जाणार्‍या दोन मुली चारचाकी वाहनाने ओव्हरटेक केल्याने तोल जाऊन खड्ड्यात पडल्या होत्या.