Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र 'स्मार्ट' नाशिकच्या वाटेवर पार्किंगकडे डोळेझाक; शहराची विद्रूपतेच्या दिशेने वाटचाल

‘स्मार्ट’ नाशिकच्या वाटेवर पार्किंगकडे डोळेझाक; शहराची विद्रूपतेच्या दिशेने वाटचाल

Subscribe

स्वप्निल येवले । नाशिक

स्मार्ट शहर म्हणून नाशिक शहराची सर्वदूर ओळख निर्माण होत असली तरीही या शहरात वाहन पार्किंगची मात्र चांगलीच बोंब आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यावरील पार्किंग आणि त्यामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीचे शहराला लागलेले ग्रहण कायम आहे. असे असताना आमदार – खासदार, नगरसेवक आणि स्थानिक एकाही यंत्रणेने ही समस्या सोडविण्यासाठी ठोस पाऊल उचललेले नाही किंवा तशी भूमिकाही घेतलेली नाही. त्यामुळे नाशिकला लागलेला फास अधिकाधिक घट्ट होत आहे.

- Advertisement -

शहरात वाहन पार्किंगसाठी जागा द्या, त्यानंतर नो पार्किंगमध्ये वाहने लागली तर दंडात्मक कारवाई करा, अशी प्रतिक्रिया नाशिककरांकडून व्यक्त होत होत्या. मात्र, वर्ष उलटूनही महापालिकेकडून अद्याप पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. परिणामी वाहनधारक रस्त्याकडेला जागा मिळेल तेथे गाडी पार्क करून बाजारात जात असल्याचे दिसते आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शहराच्या बाजारपेठेतील रस्त्यांवर अचानकपणे नो पार्किंगचे फलक लावण्यात आले. परंतु, पार्किंग कुठेही उपलब्ध करून दिलेली नसताना हे फलक लावल्याने व्यापारी व ग्राहकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. शहरातील अनेक मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेचे मोकळे भूखंड असताना त्यावर महापालिका पार्किंगची व्यवस्था का करत नाही, त्या जागा राजकीय पुढार्‍यांच्या तसेच काही विशिष्ट बिल्डरांच्या घशात तर घालायच्या नाहीत ना, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

यापूर्वी देखील महापालिका प्रशासनाला हाताशी धरुन काही लोकप्रतिनिधींनी मोकळे भूखंड विकासकाला दिले. त्यात नागरिकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्याची अट टाकण्यात आली होती. त्या ठिकाणी उंच इमारत उभ्या राहिल्या परंतु, त्या ठिकाणी पार्किंगच्या कोणत्याही सुविधा नसल्याने तेथे वाहन सुरक्षित कसे राहील म्हणून कुणीही पार्किंगसाठी जात नाही. याचाच फायदा घेत त्या पार्किंगच्या जागेचा सध्या गोडाऊन तसेच, हातगाड्या चालकांकडून विशिष्ट रक्कम घेऊन वापर केला जात आहे. त्यामुळे अशा पार्किंग ठिकाणांचा शोध घेत महापालिकेने पार्किंगची व्यवस्था करुन द्यावी. तसेच, महापालिकेच्या मोकळ्या जागांचाही विचार केल्यास पार्किंगचा बिकट प्रश्न सुटण्यास मदत होईल.

सत्ताधार्‍यांकडून केवळ आश्वासन

- Advertisement -

महापालिकेत आलेल्या सर्वच सत्ताधार्‍यांकडून केवळ नाशिककरांना अश्वासन मिळत आले आहेत. नाशिककरांसाठी स्मार्ट पार्किंग, मल्टिलेव्हल पार्किंग उपलब्ध करून देण्याच्या अनेक घोषणा करण्यात आल्या आणि त्या बासनात गुंडाळल्या गेल्याचे नाशिककरांनी अनुभवले आहे.

इमारतींच्या पार्किंगची तपासणी व्हावी

शहरातील व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगची महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून पाहणी करत तात्काळ कारवाई झाली पाहिजे. अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये हातगाड्या तसेच, पत्र्याचे शेड बांधून देत भाडे घेतले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पार्किंगमध्ये हॉटेल व्यवसाय

शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, पंचवटी, सिडको अशा अनेक भागांत गाळ्यांमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करत इमारतींच्या पार्किंगच्या जागेत टेबल-खुर्च्या मांडत व्यवसाय केला जात आहे. या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावर वाहन पार्किंग करतात. त्यामुळे या भागात नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. अशा व्यावसायिकांवर महापालिका व पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बाजारपेठेत हवी पार्किंग

एमजी रोड, सीबीएस, रविवार कारंजा, गोदाघाट, शालिमार, शरणपूररोड, गंगापूर रोड, शरणपूररोड, नाशिकरोड या मध्यवर्ती बाजारपेठ व सर्वाधिक गर्दीची ठिकाणे असलेल्या भागात नागरिकांना पार्किंगची व्यवस्था तातडीने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. या परिसरांमध्ये महापालिकेच्या अनेक मोकळ्या जागा असून, त्याठिकाणी वाहन पार्किंगची सोय उपलब्ध केली पाहिजे.

- Advertisment -