घरक्राइमवृद्ध महिलेची सोन्याची पोत हिसकावली; चार तासांत चोरट्यास अटक

वृद्ध महिलेची सोन्याची पोत हिसकावली; चार तासांत चोरट्यास अटक

Subscribe

पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाणा करत वृद्ध महिलेची सोन्याची पोत हिसकावणार्‍या चोरट्यास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अवघ्या चार तासांत अटक केली. विशेष म्हणजे, चोरटा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. संदिप पोपट कालेवार (वय २७, रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

सोमवारी (दि.१८) दुपारी १२.१५ वाजता प्रभात रेसिडेन्सी, राजपाल कॉलनी, पंचवटी येथे अनोळखी व्यक्ती आला. य्ताने बेबीबेन पटेल (वय ७७) यांच्याकडे पिण्याचे पाणी मागितले. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला. याप्रकरणी बेबीबेन पटेल यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस व गुन्हे शाखा युनिट एकने समांतर तपास सुरु केला. युनिट एकच्या पथकास चोरटा मधुबन कॉलनी, पंचवटी येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने पळ काढला. मात्र, पथकाने पाठलाग करत त्याला पकडले. पथकाने त्याला चोरीबाबत विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ६८ हजार ४०० रुपयांची सोन्याची पोत ताब्यात घेतली.

- Advertisement -

महिलेने मानले पोलिसांचे आभार

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवली. पोलिसांनी सापळा रचत चोरट्याला मुद्देमालासह अवघ्या चार तासांत अटक केली. त्यानिमित्त तक्रारदार वृद्ध महिला व तिचे नातेवाईक, सोसायटी रहिवाशांनी पोलिसांचे आभार मानले. यावेळी वृद्धेने पोत परत मिळाल्याच्या आनंदात पोलिसांसह सोसायटील रहिवाशांना पेढे वाटले.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -